यवतमाळ: पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल करणारं चायरे कुटुंब गायब

गावक-यांनीही चायरे कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मदत जाहीर करण्याची मागणी केलीय. 

Updated: Apr 11, 2018, 06:37 PM IST
यवतमाळ: पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल करणारं चायरे कुटुंब गायब title=

यवतमाळ: जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणाला नाट्यमय वळण प्राप्त झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुन्हा आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी करत मृत शंकर चायरेंच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिलाय. त्यामुळे चायरेंचा मृतदेह शवविच्छेदनाविनाच रुग्णालयात पडून असतानाच हे चायरे कुटुंबच गायब झाल्यामुळे या प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे.

 गावक-यांनीही चायरे कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला 

दरम्यान, उद्या (गुरूवार, १२ एप्रिल) मुख्यमंत्र्यांचा यवतमाळ दौरा असल्यामुळे प्रशासनावर हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलिस आणि प्रशासनावर मोठा दबाव आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाची चायरे कुटुंबाला शोधण्यासाठी धावाधाव सुरू झालीय. यापूर्वीच मृत शंकर चायरे यांच्या मुलीनं मोदींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीय. तसंच मोदींवर गुन्हा दाखल कऱण्याची मागणीही त्यांच्या मुलीनं केलीय. गावक-यांनीही चायरे कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मदत जाहीर करण्याची मागणी केलीय. त्यामुळे आता हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

माजी खासदार नाना पटोलेंची मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत चायरेंनी मोदी जबाबदार असल्याचं नमूद केलं होतं. आता या प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला आहे. सामान्य माणसानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राच्या आधारवर पोलीस गुन्हा दाखल करतात. तर मग हे प्रकरण वेगळं कसं असू शकतं, असा प्रश्न माजी खासदार आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पटोले यांनी केली आहे.