छत्रपती शिवाजी महाराजांची 'जगदंबा' तलवार सापडली

हा ऐतिहासिक ठेवा देशात परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी

Updated: Mar 12, 2021, 08:51 PM IST
छत्रपती शिवाजी महाराजांची 'जगदंबा' तलवार सापडली title=

प्रताप नाईक, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन तलवारी प्रसिद्ध आहेत. एक अर्थातच त्यांची भवानी तलवार आणि दुसरी जगदंबा तलवार... यातली जगदंबा तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रही असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा ऐतिहासिक ठेवा देशात परत आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी होते आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत... जे नाव उच्चारताच मराठी माणसाची छाती अभिमानानं फुलून येते तो हा राजा... शिवरायांच्या पराक्रमानं पावन झालेली ही जगदंबा तलवार सध्या ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे. कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी १८७५ मध्ये तत्कालीन ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स याला एक तलवार आणि एक कट्यार भेट दिली होती. ती शिवरायांच्या वापरातील जगदंबा तलवार असल्याचं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सिद्ध केलं आहे.

इंग्लंडमधील साउथ केनस्टिंग गॉन म्युझियमचे संचालक सी. प्युरडॉन क्लार्क यांनी तिथं असलेल्या भारतीय शस्त्रांची यादी तयार केलीये. त्यात जगदंबा तलवारीची फोटोसह माहिती आहे. 

मराठा तलवार... जुनी युरोपियन एकपाती, सरळ... दोन्ही बाजूला दोन खोबणी असून एकामध्ये IHS असं तीन वेळा कोरलंय. तलवारीची मूठ लोखंडी असून त्याला गोलाकार परज आहे. मुठीजवळ सोन्याच्या फुलांचं नक्षीकाम, मोठे हिरे आणि माणिक जडविले आहेत. तलवार कोल्हापूरच्या छत्रपतींच्या कडून दिली गेली असून ती मराठ्यांचे प्रमुख शिवाजी यांची निशाणी आहे, असा उल्लेखही करण्यात आलाय.

तलवार देशात परत आणण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र सातत्य नसल्यामुळे यश मिळू शकलं नाही. कोल्हापुरच्या शिवदुर्ग संवर्धन आंदोलन या संघटनेनं आता पुन्हा कंबर कसलीये. इंग्लंडची क्रिकेट टीम भारतात असताना संघटना आक्रमक झाल्याचं दिसतं आहे. 

राज्य आणि केंद्र सरकारनं जाणीवपूर्वक प्रयत्न करून महाराजांच्या हस्तस्पर्शानं पावन झालेली जगदंबा परत आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.

ही तलवार इंग्लंडच्या राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात असल्याचे ठसठशीत पुरावा समोर आलाय.. किमान आतातरी छत्रपतींच्या नावे राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ती तलवार तात्काळ भारतात यावी या दृष्टीने पावले टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.