सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, सात-बारा कोरा करा म्हणत विरोधकांचा सभात्याग

शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Updated: Dec 21, 2019, 05:43 PM IST
सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, सात-बारा कोरा करा म्हणत विरोधकांचा सभात्याग title=

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. २ लाखापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे. आज विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्र्यांची याची घोषणा केली. महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत ही कर्जमाफी दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात याची घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी केली. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकीत कर्ज माफ केले जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ही कर्जमाफी योजना येत्या मार्च महिन्यापासून लागू होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत आहे, अशा सर्व शेतकऱ्यांचं २ लाखापर्यंत कर्ज हे सरकार माफ करत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना य़ावेळी मी जाहीर करतो आहे. या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अटी नाहीत. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना कुठेही हेलपाटे घालावे लागणार नाही.'

'नियमित कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील लवकरच मोठी घोषणा करण्यात येईल', असं आश्वासन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी २ लाखापर्यंतच्या कर्जमाफीवर मात्र भाजपने आक्षेप घेतला आहे. तुम्ही सातबारा कोरा करणार असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे ते आश्वासन तुम्ही पाळावं असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदतीचं आश्वासन तर पाळलंच नाही. पण ही कर्जमाफी देखील पुरेशी नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. यानंतर याचा निषेध करत विरोधीपक्षाने सभात्य़ाग केला.