बुलडाण्यात ५०० रुपयात कॉपी करण्याची परवानगी, बीएससीचा पेपर अर्ध्या तासात बाहेर

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा या ठिकाणी शिवाजी महाविद्यालयातील प्रकार.

Updated: May 10, 2019, 07:38 PM IST
बुलडाण्यात ५०० रुपयात कॉपी करण्याची परवानगी, बीएससीचा पेपर अर्ध्या तासात बाहेर title=

मयूर निकम, बुलडाणा : परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी शालेय जीवनात कॉपी करणारे आपण अनेक कॉपी बहाद्दर पाहिले आहेत. परंतू हे शाळेपूर्तीच मर्यादितच न राहता कॉलेजमध्ये देखील हा प्रकार होत आहे. असाच प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा या ठिकाणी शिवाजी महाविद्यालयात उघड झाला आहे. आज बीएससीचा पेपर सकाळी नऊ वाजता सुरू झाला आणि अर्ध्या तासातच तेथील प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यामुळे जी पीढी विज्ञान क्षेत्रात नवे तंत्रज्ञान घडविणार, त्यांनीच कॉपी तंत्र अवलंबविल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे अस्वस्थ चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयाच्या प्राचार्याने सुद्धा परीक्षार्थी कॉप्या करतात, असा दुजोरा दिल्याने परीक्षा केंद्रावरील कॉपीच्या सुळसूळाटावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शिवाजी महाविद्यालयाचा इतिहास कॉपीच्या बाबतीत फार काही बरा नाही. तेथील शिक्षकच परीक्षार्थ्यांना कॉपी पूरवीतात असे सर्वश्रृत आहे. मात्र चिंताजनक हेच की, या प्रकारावर ठोस कार्यवाही का होत नाही?. राज्यभरात बीएससीची परिक्षा सुरु आहे. त्यापैकी मोताळा शहरातील शिवाजी महाविद्यालय परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी परीक्षा देत होते. या परीक्षागृहात आणि परीक्षागृहाबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची चंगळ दिसून आली. परीक्षाकेंद्राच्या आत स्वतः शिक्षकच कॉपी पुरवित असल्याची धडपड होत होती. या परीक्षा केंद्रावर प्रचंड प्रमाणात कॉपीसाठा आढळून आला. 

काही कॉपीचा ढिगारा जाळून टाकण्यात आल्याचे ही स्पष्ट दिसून आले आहे. याबाबत झी मीडियाने प्राचार्यांना विचारपूस केली असता त्यांनी उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. परंतु पुरावे दाखवल्यावर बोबडी वळल्याने त्यांनी म्हटलं की, काही विद्यार्थ्यांनी कॉपी केली आहे आहे. हा प्रकार मी उद्यापासून बंद करतो" अशी कबूली प्राचार्य डॉ. हरीदास पाटील यांनी दिली. दरम्यान टक्केवारीचे भूत विद्यार्थी-पालकांच्या मानगूटीवर स्वार झाल्याने उत्तम गुण मिळविण्यासाठी शिक्षकांसह परीक्षार्थ्यांनी शॉर्टकटचा अवलंब केल्याचे जिजा माता परीक्षा केंद्रावर दिसून आले.

शिवाजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर गेल्या अनेक वर्षापासून कॉपीचा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे. परीक्षाकेंद्रावर सामूहिक कॉपी चालणे दुदैवी आहे. यात विद्यार्थी, पालक, शिक्षक, केंद्र संचालक हे सर्व एकमेकांवर मेहेरबान असतात. असा आरोप होतो आहे. याला अमरावती विद्यापीठाकडून आलेले निरीक्षक गोकूळ परमेश्वर यांनी दुजोरा देत आज खंत व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य निश्चित करणारी परीक्षा महत्वाची असते. त्यामुळे या परीक्षांना सामोरे जाणारे विद्यार्थी व पालकांच्या मनात एक अनामिक धाकधूक असते.

खणखणीत यश मिळावे यासाठी विद्यार्थी जीव तोडून अभ्यास करतात. पण या परीक्षा सुरू असतांना कॉपी बहाद्दर आपले कारनामे सुरु ठेवत आहे. दरवर्षीच या परीक्षा केंद्रावर परीक्षा होते. अनेक अधिकाऱ्यांनी या गोष्टीला विरोध केला नाही. माझा विरोध आहे. या बाबत व्हिडिओ फोटो सुद्धा माझ्याकडे उपलब्ध असून हे प्रकरण उचलून धरणार, अशी प्रतिक्रिया गोकूळ परमेश्वर यांनी दिली असली तरी एक अधिकारी येण्यापूर्वी कॉपी रोखण्यासाठी महाविद्यालयीन यंत्रणा कॉपी सारख्या प्रकाराला बळ देते. यापेक्षा मोठे दुदैव ते कोणते?