कोरोना उद्रेकावरुन नाना पटोले यांचा टोला, 'केंद्राने या देशाची स्‍मशानभूमी केली'

रायगडच्‍या (Raigad) दौऱ्यांवर आलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीकास्‍त्र सोडले आहे.

Updated: May 22, 2021, 04:00 PM IST
कोरोना उद्रेकावरुन नाना पटोले यांचा टोला, 'केंद्राने या देशाची स्‍मशानभूमी केली' title=

 प्रफुल्‍ल पवार / अलिबाग : रायगडच्‍या (Raigad) दौऱ्यांवर आलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) जोरदार टीकास्‍त्र सोडले आहे. मार्चमध्ये देश कोरोनामुक्‍त झाल्याचे जाहीर केले. आता कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. मृत्यूसंख्या वाढली आहे. मोदी आणि भाजप सरकारने या देशाची स्‍मशानभूमी केली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची थटटा करण्‍याचे काम भाजपने केले. मोदींच्‍या अहंकारामुळे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे आज देशात स्‍मशानभूमीची स्थिती दिसून येत आहे, अशा शब्‍दात नाना पटोले यांनी जोरदार हल्‍लाबोल चढवला.

रायगड येथे वादळग्रस्‍त भागाची पाहणी करण्‍यासाठी नाना पटोले आज जिल्‍हयाच्‍या दौऱ्यावर आले आहेत त्‍यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या सरकारने डब्‍ल्‍यूएचओने दिलेल्‍या मार्गदर्शक तत्‍वांकडे दुर्लक्ष केले. ऑक्‍टोबर महिन्‍यातच कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेचा अलर्ट जागतिक आरोग्य संघटनेने  दिला होता. परंतु मार्चमध्‍ये केंद्राच्‍या आरोग्‍य मंत्रालयाने देश कोरोनामुक्‍त झाल्‍याचे जाहीर केले आणि मार्चमध्‍येच दुसरी लाट आली. परंतु पंतप्रधान निवडणूका जिंकण्‍याच्‍या मागे लागले. कोरोनाच्‍या सर्व्‍हेमध्‍ये कोरोनाची परिस्थिती न हाताळणारा प्रधानमंत्री म्‍हणून मोदी पुढे आले.  मागीलवर्षी जानेवारीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी कोरोनाचे गांभीर्य देशाच्‍या पंतप्रधानांना पत्र लिहून लक्षात आणून दिले होते . परंतु त्‍यांची थटटा करण्‍यात आली . विरोधकांचे ऐकायचे नाही त्‍यांची टिंगल करायची हे धोरण भाजप आणि सरकारने अवलंबले. त्‍यामुळे ही वेळ आल्‍याचे नाना पटोले म्‍हणाले .

'शेलार यांच्‍या प्रमाणपत्राची गरज नाही'

विदुषक कोण हे जगाला माहीत आहे. नाना पटोले हे राजकारणातील विदुषक आहेत, अशी टीका भाजपाचे आशीष शेलार यांनी केली होती त्‍याला कॉंग्रेस प्रदेशाध्‍यक्ष  नाना पटोले यांनी जोरदार उत्‍तर दिलंय. आशिष शेलार हा भाजपातील छोटा कार्यकर्ता आहे. या देशातील विदुषक कोण आहे हे कोरोना काळातसंपूर्ण जगाने पाहिले आहे. तर पश्चिम बंगालमधील निवडणूकीत देशाने अनुभवले आहे. कॉंग्रेस आणि नाना पटोलेला आशिष शेलार किंवा भाजपच्‍या प्रमाणपत्राची गरज नाही असं नाना पटोले म्‍हणाले.

यावेळी कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई , रायगड जिल्‍हाध्‍यक्ष माणिकराव जगताप, महिला जिल्‍हाध्‍यक्ष अॅड. श्रदधा ठाकूर, अलिबाग तालुका अध्‍यक्ष योगेश मगर, माजी जिल्‍हाध्‍यक्ष अॅड. जे. टी. पाटील हजर होते.  या दरम्‍याने नाना पटोले यांनी अलिबागमधील नवगाव समुद्रकिनारी जावून मच्‍छीमारांच्‍या झालेल्‍या नुकसानीची पाहणी केली तेथील मच्‍छीमारांशी संवाद साधला. नुकसानग्रस्‍त नारळी पोफळीच्‍या बागांचीही त्‍यांनी पाहणी केली.