शहरातून गावांमध्ये चाललाय कोरोना, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण ?

 ग्रामीण भागात भीतीचे वातावरण असून आरोग्य आणि महसूल यंत्रणा सतर्क 

Updated: May 18, 2020, 11:17 AM IST
शहरातून गावांमध्ये चाललाय कोरोना, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण ? title=

मुंबई : रायगडमधील माणगावच्या कुशेडे गावात एकाच दिवशी कोरोनाचे ५ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये २ महिला, २ पुरुष आणि एका ८ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. त्यामुळे या गावातील रुग्णसंख्या ६ झाली आहे. रायगड जिल्ह्यात मुंबईतून आलेल्या नागरिकांकडून कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण असून आरोग्य आणि महसूल यंत्रणा सतर्क झाली आहे.

कल्याण डोंबिवलीत क्षेत्रात सर्वाधिक ४२ कोरोना बाधित रुग्ण वाढल्याचे निदर्शनास आले. कल्याणमध्ये २६, डोंबिवलीमध्ये १३ तर टिटवाळा मांडा येथे ३ कोरोना बाधित रुग्ण आढळले. कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोना बाधिताची ५०० वर पोहोचली असून १८० हून अधिक जणांना डिस्चार्च देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. 

धक्कादायक! राज्यात कोरोना रुग्णांमध्ये एका दिवसात मोठी वाढ

लातूर शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. शहरातील माळी नगर भागात राहणारा रुग्ण ठाणे येथून आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे दिसून आले. चाकूर आणि जळकोट तालुक्यातही नव्यानेच प्रत्येकी ०१ कोरोना पॉझिटिव्ह तर उदगीरमध्ये आणखी ०३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २४ वर गेली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात ३ कोरोना बाधित रुग्ण आढळले. वेगवेगळ्या २ ठिकाणी क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कुरखेडा येथील क्वारंटाईन केंद्रातील 2 तर चामोर्शी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. तीनही रुग्ण मुंबई येथे छोट्या उद्योगात कामगार होते. मुंबईतून पळून करून गावी पोचल्यावर यंत्रणेने त्यांना क्वारंटाईन केले होते. 

साताऱ्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. कराडमध्ये दोन तर साताऱ्यात तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. साताऱ्यातील कोरोना बाधितांची संख्या आता १३८ वर पोहोचली आहे. 

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०० पार गेली आहे. आज ९ जणांचा अहवाल पॉसिटीव्ह आल्याने एकूण रुग्ण संख्या २०४ झाली आहे. 

एका दिवसात वाढ 

राज्यामध्ये २४ तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. आज राज्यामध्ये कोरोनाचे तब्बल २,३४७ रुग्ण वाढले आहेत. एका दिवसातली रुग्णवाढीची ही सर्वाधिक संख्या आहे. तर मुंबईमध्येही कोरोनाचे १,५९५ रुग्ण वाढले आहेत. आज दिवसभरात राज्यात ६३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

महाराष्ट्रात आता कोरोनाचे एकूण ३३,०५३ रुग्ण आहेत. आजच्या एका दिवसात कोरोनाचे ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले.

यामुळे राज्यात आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७,६८८ एवढी झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ११९८ झाली आहे.