ऑनलाईन पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची सायबर कॅफेकडून फसवणूक

ऑनलाईन पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांची सायबर कॅफे चालकाने दिशाभूल करीत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार 

Updated: Jan 16, 2020, 09:04 AM IST
ऑनलाईन पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची सायबर कॅफेकडून फसवणूक title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : ऑनलाईन यंत्रणेचा शेतकऱ्यांना फटका बसत असतानाच आता ऑनलाईन पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांची सायबर कॅफे चालकाने दिशाभूल करीत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या आर्णी तालुक्यात उजेडात आला आहे. श्रीगणेशा सायबर कॅफेचा संचालक श्रीकांत काळे असे आरोपीचे नाव असून शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.  

सायबर चालक काळे याने ऑनलाईन प्रधानमंत्री पिक विमा योजनेत बनावट पावत्या देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या तक्रारींमुळे कृषी व महसूल यंत्रणा देखील हादरली आहे. शेतकऱ्यांना शेती उत्पादनात स्थैर्य प्राप्त करून देता यावे आणि नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणाने होणाऱ्या नुकसानी पासून बचाव करता यावा यासाठी पिक विमा योजना निर्माण करण्यात आल्या. सदर पिक विमा योजनेत प्रीमियम शेतकऱ्यास भरावा लागतो. 

हा विमा भरण्याची सुविधा आर्णी येथील श्री गणेशा सायबर चालकाकडे उपलब्ध करून दिली होती. याठिकाणी शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला तद्नंतर शेतकऱ्यांनी विमा अर्जाबाबत सविस्तर चौकशी केली असता आर्णी तालुक्यातील काही गावाची नावे यादीत ऑनलाईन दिसून आली नाही. याबाबत सायबर कॅफे चालकाकडे विचारणा करायला शेतकरी गेले मात्र सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा सायबर कॅफे चालक आता सायबर कॅफे बंद करून पसार झाला. 

तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार धीरज स्थूल यांनी तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड यांना आदेश देऊन पोलिसात तक्रार दाखल केली.या सायबर कॅफेचा कॉमन सर्व्हिस आयडी रद्द करण्याचा प्रस्ताव देखील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कडे पाठविला आहे.

शहरातील सर्व सायबर कॅफे सेंटरची चौकशी करण्यात येणार असल्याचेही तहसिलदारांनी सांगितले.