औरंगाबादमध्ये मृतांच्या आकड्यात होतेय वाढ, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचं नियोजन झालं अवघड

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना मृतांचा आकडाही वाढतोय.

Updated: Mar 19, 2021, 10:22 PM IST
औरंगाबादमध्ये मृतांच्या आकड्यात होतेय वाढ, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचं नियोजन झालं अवघड title=

विशाल करोळे, औरंगाबाद : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना मृतांचा आकडाही वाढतोय. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारांचं नियोजन बिघडत चाललंय. असं असताना कोरोनाबाधितांवर गेल्या वर्षभरापासून अंत्यसंस्कार करणाऱ्या बचत गटांचे कार्यकर्ते धीरानं परिस्थिती हाताळत आहेत.

कुटुंबीयांचं दुःख पाहून हेलावले स्वयंसेवक

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना औरंगाबाद त्याला अपवाद नाही. गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 90 जणांचा बळी गेला असताना स्मशानभूमीवर ताण येऊ लागलाय. दिवसाला 12-15 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतायत. त्याचं नियोजन करणं कठीण होतंय. पंचशील बचत गटाचे कार्यकर्ते कोरोनाची साथ पसरल्यापासून हे काम करतायत. त्यांनी आतापर्यंत सुमारे बाराशे अंत्यसंस्कार केलेत. हॉस्पिटलमधून मृतदेह आणल्यापासून अग्नी देण्यापर्यंत सर्व कामं पीपीई किट घालून न थकता करत आहेत.

आधी नातलगांना परवानगी नव्हती. मात्र आता एका नातलगाला पूर्ण काळजी घेऊन अंत्यसंस्काराला हजर राहण्याची परवानगी देण्यात आलीये. त्यामुळे अंत्यसंस्कारांबरोबरच नातलगांना धीर देण्याचं कामही पंचशील ग्रूपचे कार्यकर्ते करत आहेत.

काळजी घ्या, नाहीतर स्थिती बिकट होईल !

पुढचे २ महिने धोक्याचे असून नागरिकांनी प्रचंड काळजी घेण्याचं आवाहन महापालिका अधिकारी करत आहेत. औरंगाबादमध्ये रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ लागलाय. चित्र यापेक्षाही गंभीर होण्याची भीती आहे. रात्रच नव्हे, तर दिवसही कोरोना नावाच्या वैऱ्याचे आहेत. योग्य काळजी घेतली नाही, तर स्थिती अधिक बिकट होईल.