पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस ठरले दुसरे मुख्यमंत्री

वसंतराव नाईक सलग 13 वर्षे मुख्यमंत्रीपदी होते.

Updated: Jun 27, 2019, 02:26 PM IST
पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस ठरले दुसरे मुख्यमंत्री title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास घडविला आहे. सलग 5 वर्षे मुख्यमंत्रीपद उपभोगणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील पहिले गैरकाँग्रेसी मुख्यमंत्री ठरले आहेत. महत्वाचं म्हणजे 1972 नंतर अशी कामगिरी कोणत्याच नेत्याला करता आली नव्हती. वसंतराव नाईक सलग 13 वर्षे मुख्यमंत्रीपदी होते.

सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. अवघ्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे शरद पवारांनंतरचे फडणवीस पहिले नेते. त्यांच्या निवडीवर चर्चेचं गु-हाळ चालवणाऱ्या राजकीय पंडितांचे अंदाज खोटे ठरवत फडणवीसांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. 

सत्तेत असलेली शिवसेना सतत ५ वर्षं हल्लाबोल करत होती. पण चतुर चाणाक्ष फडणवीसांनी शिवसेनेशी लढाही दिला आणि दुसरीकडे युतीही तुटू दिली नाही. विशेष म्हणजे शिवसेनेच्या स्थापना दिनाला हजेरी लावणारे ते पहिले मुख्यमंत्री होते.

सुरुवातीला विदर्भाचे मुख्यमंत्री अशी टीका होऊनही मुख्यमंत्र्यांनी अख्ख्या राज्याची मोट व्यवस्थित बांधली. स्वतःच्या पक्षातल्या लोकांना सांभाळणं, सतत टीकेचे बाण सोडणाऱ्या शिवसेनेला हाताळणं आणि त्याचवेळी विरोधकांना निष्प्रभ करणं आणि शेवट़ी शेवटी तर विरोधी पक्षनेत्यालाच भाजपमध्ये आणणं, हा करिष्मा फडणवीसांनी करुन दाखवला.

वेगाने काम करण्याचा हातखंड, स्वच्छ प्रतिमा, हजरजबाबीपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसं हाताळण्याची उत्तम कला यांच्या जोरावर फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद सक्षमपणे सांभाळलं. गेल्या 5 वर्षात त्यांच्या पुढ्यात अनेक प्रश्न, आंदोलनं, समस्या आणि अडचणी उभ्या ठाकल्यात. त्या सर्वांवर त्यांनी करारीपणानं मात केली .

अभिजन, विदर्भवादी, अनुभवाची कमतरता असे अनेक टोमणे पचवत फडणवीस यांनी गेली 5 वर्षे मुख्यमंत्रीपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. कर्तुत्वाचा ठसा उमटवताना फडणवीस राज्यातील राजकारणात चॅम्पियन ठरले आहे. आता त्यांच्याच नेतृत्त्वात भाजप विधानसभेच्या रणसंग्रामाला सामोरे जाण्यास सज्ज झाला आहे.