फडणवीस, खडसे, महाजन यांची जळगावात भेट

भाजपकडून एकनाथ खडसे यांच्या मनधरणीचे प्रयत्न?

Updated: Jan 3, 2020, 11:11 AM IST
फडणवीस, खडसे, महाजन यांची जळगावात भेट title=
संग्रहित फोटो

जळगाव : धुळे नंदुरबारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा दौरा करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पहाटे जळगाव मुक्कामी आहेत. गुरुवारी खडसे यांनी थेट फडणवीस आणि गिरीश महाजन हेच माझं तिकीट कापण्यात कारणीभूत आहे असे आरोप केले होते. आरोप करताच फडणवीसांचं जळगावात येणे आणि मुक्कामी थांबणे यामुळे खडसे यांच्या समजुतीसाठी फडणवीस आल्याची चर्चा जळगावात सुरू आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांची जळगावात भेट झाली आहे. जैनहिल्स येथील श्रद्धाधाम येथे फडणवीस, महाजन आणि खडसेंची बैठक पार पडली. यावेळी फुलं देत खडसेंकडून फडणवीसांचं स्वागत करण्यात आलं. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

मध्यंतरीच्या काळात एकनाथ खडसे यांनी जे पी नड्डा यांच्याशी बातचीत करून राज्याच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुरावेही सादर केले होते. 

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या बैठकीत खडसे आणि महाजन या दोघांनीही खेळीमेळीने आमच्यात आनंदीआनंद असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता फडणवीस यांच्या दौर्‍यात या तिघांची भेट होते का? खडसे फडणवीस यांच्या भेटीला जातात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, खडसे शिवसेनेच्या संपर्कात होते, असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्याबाबत संकेतही दिले होते. त्यामुळे जळगाव जिल्हा परिषदेत चमत्कार होणार अशी चर्चा होती. मात्र, पुन्हा खडसे आणि महाजन एकत्र आल्याने भाजप जिल्हा परिषदेतील सत्ता आपल्याकडेच राखेल असा अंदाज आहे.