Ganeshotsav 2020 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर

परिवहन मंत्र्यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा   

Updated: Aug 4, 2020, 03:59 PM IST
Ganeshotsav 2020 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून प्रवाशांसाठी काही खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. खुद्द राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली. ज्यामध्ये त्यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुकर कसा होईल, यावर भर दिल्याचं पाहायला मिळालं. 

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे समोर मांडले. ज्यामध्ये एसटी प्रवासासाठीच्या आरक्षण प्रक्रियेला अर्थात बुकींगला मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरुवात होणार असल्याचं सांगितलं. त्याशिवाय गणेशोत्वसाठी गावाला जाणाऱ्यांकरता आता १० दिवसांचा क्वारंटाईन कालावधी असणार आहे. होम क्वारंटाईन पद्धतीनं त्यांना या नियमांचं पालन करावं लागणार आहे. 

दरवर्षी मोठ्या संख्येनं मुंबईतून कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांची संख्या पाहता एसटी गाड्यांची संख्याही मोठी असते. यंदाच्या वर्षी कोरोनाचं संकट लक्षात घेता परिवहन मंडळाकडून प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी खास कोकणासाठी ३ हजार एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं परब यांनी सांगितलं. 

कोकणात जाणाऱ्यांसाठीचे काही नियम खालीलप्रमाणं.... 

- जे चाकरमानी कोकणात जातील, त्यांना १२ ऑगस्टपर्यंत अपेक्षित स्थळी पोहचायचं आहे.

- त्यांच्यासाठी १० दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी करण्यात आला आहे. 

- १२ तारखेनंतर जायचं झाल्यास त्यांनी मागील ४८ तासांत कोरोना चाचणी करणं गरजेचं असेल. 

- एका एसटी बसमध्ये २२ जण प्रवास करु शकतील. 

- ग्रुप बुकींग केल्यास एसटी थेट गावात  जाईल. ही एसटी मध्ये कुठंही थांबणार नाही. 

- एसटीनं जाणा-यांसाठी ई पासची गरज नाही.

- परंतु इतर वाहनांनी जाणा-यांसाठी ई पासची गरज असणार आहे. 

- खाजगी बस वाल्यांनी एसटी भाड्यापेक्षा दीडपटच भाडे घ्यावे. त्याव्यतिरिक्त पैसे आकारल्याची तक्रार झाल्यास कारवाई केली जाईल.