महिला सावकाराकडून त्रास, म्हणून पोलिसानं संपवला आपला श्वास

महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडलीय.

Updated: Apr 27, 2022, 05:39 PM IST
महिला सावकाराकडून त्रास, म्हणून पोलिसानं संपवला आपला श्वास title=

सांगली : सांगली शहर पोलीस ठाण्यात अतुल गर्जे-पाटील हा सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. अतुल याने द्राक्षांवर मारण्यात येणारे विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली.

महापालिकेचे काही कर्मचारी मंगळवारी केबल दुरुस्तीसाठी पोलीस ठाण्यात आले. ठाणे अंमलदाराच्या परवानगीने ते टेरेसवर गेले असता त्यांना अतुल तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आला.

या कर्मचाऱ्यांनी झालेली घटना अंमलदार यांच्या कानावर घातली. पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या शेजारी द्राक्षावरील औषध आढळले. 

परंतु, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह संपूर्ण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

अतुल गर्जे पाटील याने महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाजवळ सावकार सुवर्णा पाटील यांच्याविरोधात लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सावकार सुवर्णा पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अतुल यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी ‘साहेब... मला माफ करा,’ असे म्हणत पत्नीला ‘मुलांची काळजी घे’ असे सांगितले आहे. मृत अतुल यांना पत्नी, दोन मुली, आई, भाऊ असे कुटुंब होते.