Maharastra Politics : हिंगोलीत शिवसेनेचा यु-टर्न, अचानक बदलला उमेदवार, 'या' नेत्याला मिळालं तिकीट

Hingoli Lok Sabha Constituency : गेल्या तीन दिवसांपासून हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. अखेर शिवसेनेचे हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील (Hemant Patil) यांचा पत्ता कट झालाय.   

सौरभ तळेकर | Updated: Apr 3, 2024, 07:04 PM IST
Maharastra Politics : हिंगोलीत शिवसेनेचा यु-टर्न, अचानक बदलला उमेदवार, 'या' नेत्याला मिळालं तिकीट title=
Baburao Kadam instead of Hemant Patil Hingoli Lok Sabha Constituency

Hingoli LokSabha : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनं विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील (Rajeshri Patil) यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात (Hingoli Lok Sabha Constituency) महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित रहाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता हिंगोलीच्या राजकारणाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय.

गेल्या तीन दिवसांपासून हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. अखेर शिवसेनेचे हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील यांचा पत्ता कट झालाय. भाजपनं हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर आता बाबुराव कदम कोहळीकर शिवसेनेचे हिंगोलीचे नवे उमेदवार असणार आहेत. कोहळीकरांनी 2019 मध्ये अपक्ष म्हणून हदगाव विधानसभा लढवली होती. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मतंही त्यांना मिळाली. मात्र हेमंत पाटील यांचं तिकीट भाजपच्या दबावामुळे बदलावं लागल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठी अडचण आणि नामुष्की ओढवली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत हिंगोली मतदारसंघाचा समावेश असून हेमंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाने एक पाऊल मागे घेत हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली आहे. त्यामुळे आता हिंगोलीत भाजपचं दबावतंत्र यशस्वी झाल्याचं बोललं जातंय. हेमंत पाटील यांची उमेदवारी बदला, ही जागा भाजपला द्या, उमेदवारी कोणालाही द्या, वेळ आली तर आम्ही धनुष्यबाण चिन्ह घेऊन लढायला तयार आहोत, अशी भूमिकाही आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह बैठकीत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यानंतर आता शिंदे गटाला यु-टर्न घ्यावा लागला आहे.

दरम्यान, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा आणि इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.