माणुसकी : कर्नाटक सरकारने नाकारलेलं पार्थिव कराडमध्ये दफन

हार्ट अटॅकने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची कर्नाटक सीमेवर १४ तास हेळसांड 

Updated: May 21, 2020, 08:43 AM IST
माणुसकी : कर्नाटक सरकारने नाकारलेलं पार्थिव कराडमध्ये दफन title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर :  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीच वातावरण तयार झाल आहे..त्यामुळे अनेकजण माणुसकी विसरून स्वार्थाचा विचार करत असल्याची अनेक उदाहरण समोर  येत आहेत.. असच उदाहरण कर्नाटक सरकारच्या बाबतीत पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं आहे.. कर्नाटक सरकारने स्वतःच्या राज्यातील हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्या नागरिकाच पार्थिव राज्यात घ्यायला नकार दिला. कर्नाटक सरकारच्या संवेदनशून्य व्यवहारामुळे संताप व्यक्त होत आहे. 

कोरोना व्हायरसने माणुसकीची व्याख्याच बदलून टाकली आहे... अनेक राज्य आपल्या राज्यातील नागरिकांनाच नाकारत असल्याचे चित्र भारतात आहे..कर्नाटक राज्याने तर आत्ता कहरच केला आहे. कर्नाटकातील कारवारचा नागरिक असलेल्या ५४ वर्षीय असिफ लतीफ सैयद यांचा हृदय विकाराने गुजरात मध्ये मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह कर्नाटक सीमेवर पोहचल्यानंतर तब्बल १४ तास मृतदेहाची हेळसांड करत सैयद याचा मृतदेह कर्नाटक सरकारने नाकारून माणुसकीला काळिमा फासली आहे.

कर्नाटक राज्यातील कारवार इथला ५४ असिफ सैयद हे कामानिमित्त गुजरातला गेले होते. १७ मे रोजी त्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला. गुजरात राज्यामध्ये सैयद याचे नातेवाईक नसल्यामुळे त्याच्या नातेवाईकानी स्थानिक सहकाऱ्याला विनंती करून मृतदेह कारवारला आणण्याची विनंती केली. त्या विनंतीनुसार मुबारक आणि मकबूल साथीदाराने सर्व परवानग्या घेवून  मृतदेह गुजरात; महाराष्ट्र सीमा ओलांडून कर्नाटकच्या सीमेवर आणलं.  पण तिथल्या कर-नाटकी पोलिसांनी तब्बल १४ तास मृतदेहाची हेळसांड करून आणलेला मृतदेह कर्नाटक राज्यात प्रवेश देणार नाही अशी भूमिका घेवून मृतदेह पुन्हा गुजरात मध्ये घेवून जा असा दम भरला.

दरम्यान असिफ सैयद यांच्या नातेवाईकानी कोल्हापुरातील गणी आजरेकर यांच्याशी संपर्क करून मृतदेहाची हेळसांड न करता मृतदेहावर कोल्हापुरातच अंत्यसंस्कार करा अशी विनंती केली..आसिफ सय्यद यांच्या मृतदेहाची हेळसांड होत असल्याचं लक्षात येताच गणी आजरेकर यांनी कोल्हापूरचे एसपी अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क केला. क्षणाचाही विलंब न लावता देशमुख यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. तो पर्यत हे पार्थिव कर्नाटकी पोलिसांनी  पुन्हा गुजरातच्या दिशेन रवाना केलं.

कोल्हापुरात दफणविधीची तयारी सुरू असतानाच हे पार्थिव कराड मध्ये पोहोचल. त्यामुळे गणी आजरेकर यांनी कराडचे नगरसेवक बरकत पटवेगार यांना आसिफच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली.. पटवेगार यांनी तात्काळ कोल्हापूरचे एसपी अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी देशमुख यांनी " यह नेक काम रह गया...आपके नशीब मे था अस सांगून दफणविधीला परवानगी दिली. जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी निर्विवादपणे मनाची संवेदनशीलता दाखवत सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दाखवली. तर दुसरीकडे कर्नाटकी पोलीस मात्र सरकारच्या आडमुठ्या नियमावर बोट ठेवून मानवतेला काळिमा फासला..

असा प्रसंग कोणावर येवू नये...आम्ही भावाचा मृतदेह कारवारला आणण्याचा प्रयत्न केला पण प्रशानाने कोव्हीड च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र; गुजरात मधून कोणालाही राज्यात न घेण्याचा कायदा करण्यात आला आहे असं सांगण्यात आलं.. हे दुर्दैवी.. भावाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होता..तरीही मृतदेह नाकाराला... असा प्रसंग किमान या पुढे कोणावरही ओढावू याची काळजी सरकारने घ्यावी, अशी प्रतिक्रिया असिफ सैयद यांचे भाऊ महंमद सय्यद यांनी व्यक्त केली.