'...म्हणून मी राजीनामा दिला', ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा पहिल्यांदाच खुलासा

सुरेश जैन हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आता सुरेश जैन यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. 

Updated: May 11, 2024, 02:56 PM IST
'...म्हणून मी राजीनामा दिला', ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा पहिल्यांदाच खुलासा title=

Jalgaon Suresh Jain Resign Reason : माजी मंत्री सुरेश जैन यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. जळगावाच्या  राजकारणातील मोठे नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जाते. यानंतर सुरेश जैन हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आता सुरेश जैन यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. तसेच त्यांनी राजीनामा देण्यामागचे कारण सांगितले आहे. 

'...म्हणून मी राजीनामा पाठवला'

सुरैश जैन यांनी नुकंतच 'झी 24 तास'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना राजकीय संन्यास घेण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तसेच यावेळी त्यांना कोणाला पाठिंबा देणार याबद्दलही विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाष्य केले. लोकसभा निवडणुकीचे मतदान आले आणि त्याच काळात मला राजीनामा द्यायला लागला. याचे कारण म्हणजे महाविकासआघाडी आणि महायुती अशा दोन्ही उमेदवारांच्या बॅनरवर माझा फोटो वापरण्यात येत होता. त्यामुळे हे कुठेतरी थांबायला हवं, अस मला वाटत होतं. त्यामुळेच हे कुठेतरी थांबायला हवं, म्हणून मी राजीनामा पाठवला, असे सुरेश जैन यांनी म्हटले.  

राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंशी संवाद

मी राजीनामा देण्यापूर्वी कोणाशीही चर्चा केली नाही. राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला. मी तुमचा ऋणी आहे. कारण बाळासाहेबांनी मला मोठं केलं. तुमच्या शिवसेनेमुळे मी मोठा झाला. त्यांचा मी सदैव ऋणी राहिल, असे मी त्यांना सांगितले, असेही त्यांनी सांगितले. 

'माझा त्या उमेदवाराला पाठिंबा'

यानंतर त्यांना पाठिंबा देण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, सध्याची लोकसभा आणि पूर्वीची लोकसभा यात मी फरक करु शकत नाही. कारण राजकीय परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी आहे. लोकांना जो कोणी आवडत असेल त्यांना ते मतदान करतील. पण मला जर कोणी विचारलं तर जो कोणी विकास करेल, जो लोकांचे हित बघेल, जळगावकरांचे हित बघेल, त्यासोबतच राज्याचे हित बघेल त्याला मी मतदान करेन. मी दोन्हीही उमेदवारांना या आधीही भेटलो आहे. त्यांच्यासाठी दरवाजे सतत खुले असतील. जर त्यांनी मार्गदर्शन मागितले तर जरुर करु, असेही त्यांनी म्हटले.