आईची नजर थोडीशी चुकली... पण तेच 6 वर्षांच्या चिमुकल्यासाठी जीवघेणं ठरलं

तुमच्या मुलांना डोळ्यात तेल घालून जपा! थोडीशी नजर चुकली तरी चिमुकल्यासाठी ती जीवघेणी ठरू शकते

Updated: Sep 4, 2021, 09:16 PM IST
आईची नजर थोडीशी चुकली... पण तेच 6 वर्षांच्या चिमुकल्यासाठी जीवघेणं ठरलं title=

वाल्मिक जोशी, जळगाव झी मीडिया: आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यावर जरा बारीक नजर ठेवावी लागते. कारण ते फार उद्योगी असतात. कधी कुठे काय करतील याचा नेम नाही. त्यांच्याकडे थोडासा झालेला कानाडोळा जीवावर बेतू शकतो. याचं उदाहरण जळगावातून समोर आलं आहे. घरात गारवा निर्माण करणाऱ्या एसी 6 वर्षांच्या चिमुकल्यासाठी जीवघेणा ठरला आहे. 

6 वर्षांच्या चिमुकल्याचा एसीच्या कॉम्प्रेन्सरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना जळगाव शहरातील निमखेडी शिवारात  विठ्ठलवाडीत घडली. आईच्या डोळ्यादेखतच घटना घडल्यानंतर तिने मुलगा केशवला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. 

रुग्णालयात डॉक्टरांनी चिमुकल्याला मृत घोषित केलं. हे पाहून आईने केलेल्या अक्रोशानंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. दुपारी गच्चीवर वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी चिमुकल्याची आई गेली. मुलगा केशव देखील त्यांच्या मागे गेला. 

आई कपडे काढत असताना केशव हा खेळत होता. खेळतानाच गच्चीवरीच एसीच्या कॉम्प्रेसरला धक्का लागला. त्यात वीज प्रवाह असल्याने केशव जागेवरच कोसळला. आज आमच्या घरामध्ये जी घटना घडलेली ती अतिशय दुखत आहे. एकुलता एक पोरगा गमावल्याचे दुःख फार मोठा आहे अशी घटना घडू नये, यासाठी आपल्या चिमुकल्यांची डोळ्यात तेल घालून काळजी घ्या असं आवाहन माऊलीनं केलं.