राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारण्यासाठी भाजपची रणनीती

 राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याची रणनीती भाजपाने आखली आहे.  

Updated: Apr 18, 2019, 07:49 PM IST
राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारण्यासाठी भाजपची रणनीती title=
संग्रहित छाया

कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. दुसरीकडे आघाडीमध्ये मात्र गोंधळाची स्थिती आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाकीपणे बालेकिल्ला वाचवण्यासाठी धडपडत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्र खरंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. २०१४च्या मोदी लाटेमध्येही कोल्हापूर, सातारा, माढा आणि बारामती या चार जागा राष्ट्रवादीने खेचून आणल्या. यंदाही पश्चिम महाराष्ट्राकडून पक्षाला आशा आहे. त्यामुळेच शरद पवारांनी इथे प्रचाराचा धडाका लावला आहे. 

राष्ट्रवादीचे हे संस्थान खालसा करण्याच्या उद्देशाने भाजपाने त्या पक्षाचे अनेक सरदार आपलेसे केले असताना पवार एकाकी झुंज देत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या मदतीला काँग्रेसचे केंद्रातले किंवा अगदी राज्यातलेही नेते फिरकत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस जाऊ दे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ सोडले तर अन्य नेतेही आपापल्या मतदारसंघात व्यस्त आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे कर्णधार एकटेच बॅटिंग करत असल्याचं दिसत आहेत. 

दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रावर पकड मजबूत करण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी इथे प्रचार सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान तर प्रत्येक सभेत राहुल गांधींपेक्षा पवारांनाच अधिक लक्ष्य करत असल्याचे दिसत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आणि पुणे या दोनच जागा काँग्रेसकडून लढविल्या जात आहे. त्यामुळे त्या पक्षाचे नेते पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारापासून दूर राहिलेत. त्यामुळे प्रचार सभांसोबतच नेते, कार्यकर्ते यांची जुळवणी करण्याचे कामही पवार एकटेच करत आहेत. यात ते किती यशस्वी होतात हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं तर त्याचं संपूर्ण श्रेय एकट्या पवारांचं असेल, अशी चर्चा आहे.