मोहोळांशी वाकडे... कडाडले संजय काकडे, पुण्यात भाजपमध्ये पक्षांतर्गत कलह

Loksabha 2024 : पुण्यातही भाजपमध्ये पक्षांतर्गत कलह उफाळून आलाय. मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीवर माजी खासदार संजय काकडेंनीच तीव्र नाराजी व्यक्त केलीय. आपली नाराजी त्यांनी बोलूनही दाखवलीय.

राजीव कासले | Updated: Mar 29, 2024, 06:38 PM IST
मोहोळांशी वाकडे... कडाडले संजय काकडे, पुण्यात भाजपमध्ये पक्षांतर्गत कलह title=

Loksabha 2024 : माढापाठोपाठ पुण्यामध्ये देखील भाजप उमेदवाराच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी उफाळून आलीय. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं माजी महापौर मुरलीधर मोहोळांना (Murlidhar Mohol) तिकीट दिलं. भाजपचे मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) असा थेट सामना पुण्यात रंगणाराय. मात्र त्याआधी मोहोळांना पक्षातूनच विरोध होतोय. भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी (Sanjay Kakde) अगदी उघडपणं आपली नाराजी व्यक्त केली. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी मन की बात बोलून दाखवली.

पुण्याच्या उमेदवारीवर काकडेंची नाराजी
पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माझ्या निवासस्थानी माझी भेट घेतली. माझ्या मनातील सर्व वेदना आणि माझ्या आयुष्यातल्या उमेदीची 10 वर्ष मी पक्षासाठी देऊन या काळात काय काय कामे केली हे त्यांना सविस्तर सांगितलं. पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील. पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील ही आशा आहे, असं काकडेंनी पोस्टमध्ये म्हटलंय.एवढंच नव्हे तर निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक आहोत. एबी फॉर्म भरेपर्यंत इच्छुकच राहणार असल्याचं काकडेंनी सांगितलं.

माढा आणि अमरावतीपाठोपाठ आता पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी जोर धरू लागलीय. पक्षशिस्तीचा बाऊ करणाऱ्या भाजपातही नाराजी आणि बंडाचं ग्रहण लागलंतय, हे विशेष. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपनं पुण्याचा बालेकिल्ला जिंकला. यंदा विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी भाजप सज्ज झालीय. मात्र मोहोळांच्या उमेदवारीला काकडेंच्या नाराजीचं गालबोट लागल्यानं भाजपची विजयाची वाट सोप्पी नसणार, एवढं नक्की.

अमरावतीतही तिढा
दरम्यान, अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. अमरावतीमध्ये नवनीत राणांविरोधात प्रहारचा उमेदवार ठरलाय.. दिनेश बुब यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून बच्चू कडूंच्या प्रहार पक्षात प्रवेश केलाय. त्यांना प्रहारकडून अमरावतीची उमेदवारी मिळालीये. बुब हे मविआकडून अमरावतीची लोकसभेची निवडणुक लढण्यास इच्छुक होते. मात्र मविआनं त्यांना उमेदवारी न दिल्यानं ते नाराज झाले. अखेर बुब यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत प्रहारमध्ये प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंनाही धक्का बसलाय तर दुसरीकडे प्रहारनं त्यांना उमेदवारी दिल्यानं बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय.. 

दुसरीकडे, खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळतंय... अभिजीत अडसूळांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली असून मुख्यमंत्र्यांनी सांगीतलं तरीही राणांचा प्रचार करणार नाही असं ते म्हणालेत.