अकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी सामना रंगणार

Loksabha 2024 Akola : अकोल्यातली लढत यंदा महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणाराय. भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना इथं रंगणाराय.  नेमकं काय आहे इथलं राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट... पंचनामा अकोला लोकसभा मतदारसंघाचा.

जयेश जगड | Updated: Apr 4, 2024, 08:54 PM IST
अकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये  तिरंगी सामना रंगणार title=

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोला... मोर्णा नदीच्या काठावर वसलेलं शहर. अकोलसिंह नावाच्या राजाच्या नावावरून अकोला (Akola) हे नाव पडलं. इथलं नरनाळा अभयारण्य हे मेळघाटचं प्रवेशद्वार. नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले इथं आहेत. कधीकाळी काँग्रेसचा असलेला हा बालेकिल्ला आता भाजपचा गड बनलाय. जिल्ह्यातल्या अनेक समस्या सोडवल्याचा दावा भाजपनं केलाय. मात्र तरीही इथले प्रश्न सुटलेले नाहीत.

अकोला... समस्यांचा वेढा 
अकोल्यात सिंचनाच्या अनेक योजना रखडल्यात, त्यामुळं शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. खारपाणपट्ट्यात नव्या योजना सुरू केल्यात, मात्र त्याचा परिणाम अजून दिसत नाहीय. औद्योगिक वसाहतींची स्थिती फारशी समाधानकारक नाही. शैक्षणिक मागासलेपण अद्यापही कायम आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळं नागरिक त्रस्त आहेत. 

अकोल्याचं राजकीय गणित
अकोला हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता तो भाजपचा (BJP) गड बनलाय. 2004  पासून लागोपाठ चारवेळा इथून भाजपचे संजय धोत्रे (Sanjay Dhotre) खासदार झाले. 2009 मध्ये धोत्रेंनी भारतीय बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांचा (Prakash Ambedkar) 64 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या (Congress) हिदायतुल्ला पटेल यांना 2 लाख मतांनी हरवलं. 2019 मध्ये त्यांनी चौथ्यांदा खासदार होताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना तब्बल पावणे तीन लाख मतांनी पराभूत केलं. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 4, काँग्रेसचा 1 आणि शिवसेना ठाकरे गटाचा 1 आमदार आहे.

यंदा प्रकृतीच्या कारणास्तव संजय धोत्रेंनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. आता त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. साधी ग्रामपंचायतीची निवडणुकही कधी न लढलेल्या अनुप यांना थेट लोकसभेचं तिकीट दिल्यानं भाजपमध्येच नाराजी उफाळून आलीय. भाजपचे बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी घराणेशाहीला विरोध करत उमेदवारी अर्ज भरल्यानं भाजपची डोकेदुखी वाढलीय.

गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकांची मतं घेणारे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पुन्हा एकदा अकोल्याच्या रणमैदानात उतरलेत. काँग्रेस त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना मविआत घेण्याचे प्रयत्न फोल ठरले आणि डॉ. अभय पाटील यांच्या रुपानं काँग्रेसनं मराठा उमेदवाराला तिकीट दिलं.

अकोला मतदारसंघात मराठा, दलित आणि कुणबी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळं यंदाची बहुरंगी लढत फारच चुरशीची होणाराय. अकोल्यात प्रत्येकवेळी तिरंगी निवडणूक झाली. आणि भाजपनं बाजी मारली. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांचं भांडण आणि लाभ भाजपला, अशीच अकोल्याची मॉरल ऑफ द स्टोरी आहे. यावेळीही तीच कथा असणार की नवी स्क्रिप्ट लिहिली जाणार? याचा फैसला 4 जूनला होईल.