'माझी भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, तुम्हाला विचारल्याशिवाय..'; जानकरांचं जाहीर भाषणात विधान

Loksabha Election 2024 Mahadev Jankar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये महादेव जानकरांच्या साधेपणाचं कौतुक केलं. त्यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या जानकरांनी स्वत:बद्दल बोलताना केलेली विधानं चर्चेत आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 2, 2024, 10:12 AM IST
'माझी भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, तुम्हाला विचारल्याशिवाय..'; जानकरांचं जाहीर भाषणात विधान title=
जाहीर सभेत जानकरांचं विधान

Loksabha Election 2024 Mahadev Jankar: महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एका जागेवरुन राष्ट्रवादी समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी जानकर यांनी परभणीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. जानकरांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये जानकरांचं कौतुक केलं. जानकरांच्या साधेपणाचं कौतुक अजित पवारांनी केलं. याच सभेमध्ये जानकरांनी आपण पूर्णपणे मतदारसंघातील लोकांच्या कामासाठी स्वत:ला वाहून घेतल्याचं सांगितलं. आपण पूर्णवेळ उपलब्ध आहोत हे सांगताना जानकरांनी केलेलं एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे.

भानगड नाय, लग्न नाय...

अजित पवारांनी महादेव जानकरांचं कौतुक करताना, सर्वसामान्य माणूस तुमचा उमेदवार आहे असं सांगितलं. जानकरांचं साधेपण सांगताना, "जानकर हे गावाकडील एखाद्या खोपट्यात बसू शकतात, तेथेच झोपू शकतात आणि सकाळी तिथंच आवरुन त्यांच्या कामाला निघू शकतात. इतका हा साधा माणूस आहे. त्यामुळेच या उमेदवाराच्या पाठिशी ताकद देऊन उभे राहा," असे आवाहन अजित पवारांनी केलं. जानकरांनी आपल्या भाषणामध्ये आपण अविवाहित असून घर-दार नसल्याने पूर्णवेळ तुमच्यासाठीच उपलब्ध आहे असं आवर्जून सांगितलं. "माझं कुठंही कॉलेज नाय, शाळा नाय, भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, हा देह तुमच्यासाठीच आहे," असे म्हणत महादेव जानकरांनी परभणीकरांना साद घातली.

नागपूर, बारामतीप्रमाणे परभणीचा विकास

यावेळेस महादेव जानकरांनी मागील लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांनाही महादेव जानकरांनी भावनिक साद घालत एक शब्द दिला. "राजेश विटेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने मी शब्द देतो की अजित दादा तुला खाली ठेवणार नाहीत," असं जानकर म्हणाले. पुढे बोलताना आपण परभणीकरांना विचारल्याशिवाय कशावरही सही करणार नाही असं म्हटलं. बारामती, नागपूरप्रमाणे आपल्याला परभणीचा विकास करायचा आहे, असंही जानकर यांनी सांगितलं. "तुम्हाला विचारल्याशिवाय मी खासदार झाल्यावरही सही करणार नाही. मला बायका-पोरं नाहीत, घरदार नाही. मी रेल्वे स्टेशनवरसुद्धा झोपू शकतो. जसा नागपूरचा, बारामतीचा विकास झाला आहे, तसाच परभणीचा विकास केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही," असं जानकर म्हणाले.

नक्की वाचा >> 'शरद पवारांनी आदेश दिला तर मी..'; पृथ्वीराज चव्हाण अगदी स्पष्टच बोलले! राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

झोळी पसरवेन

"मी सुद्धा एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. गरज पडली तर मी इतर राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांकडे परभणीच्या विकासासाठी माझी झोळी पसरवेन," असा शब्दही जानकर यांनी परभणीकरांना दिला. तसेच पुढे बोलताना जाणकर यांनी, "मी आता परभणीत घर घेतोय, इथंच एक बंगला घेऊन राहणार," असंही सांगितलं.

विमानतळ, बोगींचा प्रकल्प आणू

"मला 17 भाषा येतात. मला इंग्रजीही येतं. खासदारकीच्या ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी चांगलं लागतं, या दोन्ही भाषा मला चांगल्या येतात. परभणीच्या विकासाचं रोल मॉडेल आपण बनवूयात. परभणीमध्ये एअरपोर्ट आणण्याचा प्रयत्नही करू. रेल्वेच्या बोगींचा प्रकल्पही इथं आणण्याचा प्रयत्न करू. समृद्धी महामार्गाला परभणी जिल्हा जोडण्याचा प्रयत्न करू. जिल्ह्यात विकासाची गंगा आणण्यासाठी मी प्रयत्न करेन," असा शब्द जानकरांनी परभणीकरांना दिला.