Loksabha Election : 'बारामती पवारांचा सातबारा नाही'; कोणाच्या वक्तव्यामुळं माजली खळबळ?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्याच्या राजकारणात आता अनेक घडामोडी आणि आरोप प्रत्यारोपांची सत्र पाहायला मिळत आहेत.   

सायली पाटील | Updated: Mar 12, 2024, 07:45 AM IST
Loksabha Election : 'बारामती पवारांचा सातबारा नाही'; कोणाच्या वक्तव्यामुळं माजली खळबळ?  title=
loksabha election 2024 mahayuti leaders criticize blames in between seat distribution

Loksabha Election 2024 : महायुतीकडून जागावाटपाचं अंतिम समीकरण अद्याप समोर आलेलं नाही. असं असतानाच इथं जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नाही तोच तीनही पक्षातील नेतेमंडळींमध्ये सुरु असणारी धुसफूस मात्र राजकीय पेच निर्माण करताना दिसत आहे. महायुतीमध्ये जवळपास 8 - 10 जागांवरून वादंग माजलेलं असतानाच बारामतीमध्ये सत्ता असणाऱ्या पवारांवर शिवसेनेच्या नेत्यांनी निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे. 

एका प्रतिष्ठित वृत्तसमुहाच्या वृत्तानुसार 'बारामतीचा मतदारसंघ म्हणजे पवारांचा सातबारा नाही', असं वक्तव्य माती राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी केलं. अजित पवारांसाठी प्रचार करण्याची आपली मानसिकता नसल्याचं सांगत त्यांच्याविरोधात बारामती मतदारसंघात झालेल्या मतदानाकडे त्यांनी लक्ष वेधलं. साडेपाच लाख मतदारांचा उल्लेख करताना हा मतदारसंघ काही पवारांचा सातबारा नाही, असं परखडपणे म्हणत आपल्याला त्यांनी दिलेल्या त्रासाबद्दल जनताच त्यांना धडा शिकवेल अशी ठाम भूमिका शिवतारे यांनी मांडली. 

हेसुद्धा वाचा : Mumbai Coastal Road : श्या! कोस्टल रोडवर पहिल्याच दिवशी प्रवेशबंदी; 'या' वाहनधारकांचा हिरमोड 

एकिकडे शिवतारेंनी उपमुख्यमंत्री, अजित पवार यांच्यावर निशाणा साधलेला असतानाच तिथं भरत गोगावले यांच्या वक्तव्यानंही अनेकांच्या नजरा वळवल्या. जागावाटप सन्मानानंच झालं पाहिजे असं सांगताना आमचा अपमान केल्यास तुम्ही सन्मानाला मुकाल असा थेट इशाराच शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दिला. गोगावले यांच्यासह शिवसेनेच्या रायगडमधील आमदारांनी इथून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेते सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत आपली बाजू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे मांडली. 

महायुतीत धुमसतायत ठिणग्या... 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात शिवसेना- भाजप विरोधात उभे ठाकले आहेत. तर, कल्याणची जागा आम्ही लढणार असं म्हणत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. तिथं अमरावतीमध्ये अभिजित अडसूळ यांनी ही जागा शिवसेनेकडे राहणार असून, वडील आनंदराव अडसूळ किंवा आपण स्वत: तिथं उमेदवार असू असं म्हणत नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर श्रेय लाटण्याचा आरोप करत जनतेचा कौल मात्र आपल्यालाच असल्याचं स्पष्ट केलं.