'मुख्यमंत्री खोटारडा माणूस', राऊतांचा टोला! म्हणाले, 'आमच्याविषयी बोलणाऱ्या उरबडव्यांवर..'

Raut On CM Eknath Shinde: संजय राऊत यांनी भाजपाचे अनेक उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पराभवाच्या छायेखाली असल्याचा दावा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 7, 2024, 12:21 PM IST
'मुख्यमंत्री खोटारडा माणूस', राऊतांचा टोला! म्हणाले, 'आमच्याविषयी बोलणाऱ्या उरबडव्यांवर..' title=
संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यावर केली टीका

Raut On CM Eknath Shinde: महाराष्ट्रात आज तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 11 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. असं असतानाच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी संजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला आहे. 

महाराष्ट्रातील अनेक विद्यमान खासदार लोकसभेत दिसणार नाहीत

महाराष्ट्रातील मतदानाचा संदर्भ देत संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपा उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत असं म्हटलं आहे. "महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपा दारुण पराभवाच्या छायेत आहेत. भाजपाचे महाराष्ट्रातील अनेक विद्यमान खासदार हे यावेळेला लोकसभेत दिसणार नाही. हे महाराष्ट्राच्या जनतेचे ठरवले आहे," असं राऊत म्हणाले.

आमच्याबद्दल बोलणारे उरबडवे

दिल्लीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना राऊत यांनी थेट आव्हान दिलं. "हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची महाराष्ट्रात मोठी पुण्याई आहे. तुम्ही इथं (महाराष्ट्रात) कितीही खुंट्या ठोका तुम्हाला महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव करता येणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा. (पक्षातून) फोडलेले आमच्याविषयी बोलणारे जे उरबडवे आहेत त्यांच्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत," असं संजय राऊत म्हणाले. 

मुख्यमंत्री खोटारडे, भित्रे

"मुंबई, ठाणे, भिवंडी या सर्व जागा महाविकास आघाडी, शिवसेना जिंकतेय. एकानाथ शिंदे यांची मजल भोपळा फोडण्यापर्यंत जाईल का हे मला आता सांगता येत नाही," असा टोला संजय राऊतांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी, "मुख्यमंत्री खोटारडा माणूस आहे. आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत जो माणूस खंजीर खुपसतो. त्या व्यक्तीवर काय विश्वास ठेवता. हे डरपोक लोक आहेत. हे घाबरुन पळालेले लोक आहेत. अटकेच्या भितीने, ईडी, सीबीआय, भ्रष्टाचाराचे खटले आहेत त्यांच्यावरती त्यांनी अशाप्रकारची भाषा केल्यावर त्यांच्यावर विश्वास कोण ठेवेल?" असा प्रतिसवाल केला.

बारामतीची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई

"बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे असं मी अनेकदा म्हणालो आहे. बारामती आम्ही जिंकतोच आहोत. महाविकास आघाडीच्या सुप्रियाताई सुळे जिंकणार हे निश्चित आहे," असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. "मी सांगतोय ते लिहून ठेवा, विक्रमी मतांनी सुप्रियाताई जिंकणार आहेत," असा दावा राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी सुप्रियाताईंचं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे असं म्हणत सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून एका गृहिणीला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा टोला लगावला.