राज ठाकरेंची मनसे महायुतीसोबत? प्रश्न ऐकताच राऊतांचं 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'मोदी-शाहांना...'

Sanjay Raut On Raj Thackeray MNS Alliance With Mahayuti: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आता राऊत यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 9, 2024, 01:11 PM IST
राज ठाकरेंची मनसे महायुतीसोबत? प्रश्न ऐकताच राऊतांचं 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'मोदी-शाहांना...' title=
प्रसारमाध्यमांशी बोलताना साधला निशाणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज मुंबईमध्ये साजरा केला जाणार आहे. यानिमित्त पक्षाचते अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मध्यंतरी राज ठाकरेंनी नवी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पार्टीचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. या भेटीसहीत राज ठाकरे आता महायुतीसहीत लोकसभेची निवडणूक लढणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्यानंतर कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मनसेच्या नेत्यांनी लवकरच राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील असं सांगितलं होतं. याच मेळाव्यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला राऊत यांनी मोजून 4 शब्दांमध्ये उत्तर दिलं.

4 शब्दांमध्ये दिलं उत्तर

मुंबईमध्ये आयोजित महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेआधी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस पत्रकारांनी राऊत यांना मनसेच्या मेळाव्याच्या संदर्भातून प्रश्न विचारला. "आज मनसेचा मेळावा होतोय. फडणवीस म्हणालेत की मनसे सोबत येईल अशी शक्यता आहे," असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, "माझ्या दोघांनाही शुभेच्छा आहेत," असं म्हटलं. 

फडणवीस यांना लगावला टोला

त्यानंतर काही क्षण थांबून संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा उल्लेख करत केलेल्या विधानाची आठवण करुन दिली. "आज गुढीपाडवा आहे. आज पवित्र आणि मंगलमय शुभकामना केल्या पाहिजेत. मोदी आणि शाहांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देऊ नका अशी राज ठाकरेंची भूमिका होती. त्यामुळे त्या मताशी महाराष्ट्र सहमत आहे. तरीही देवेंद्र फडणवीस आपण त्यांना एकत्र घेऊयात वगैरे म्हणत आहेत ती त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे," असा टोला राऊत यांनी लगावला. "मोदी-शाहांना पाय ठेऊ देऊ नका. ते महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. आता महाराष्ट्राच्या दुश्मनांना कोण पाय ठेऊन देतंय मुंबई महाराष्ट्रात हे आम्हाला पाहायचं आहे," असा खोचक टोला राऊत यांनी मनसेला लगावला आहे.

फडणवीस यांचे संकेत

मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत फडणवीस यांनी यापूर्वीच संकेत दिले आहेत. मनसे सोबत चर्चा गेल्या काही काळात झाल्या आहे. मनसेने जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा स्वीकारला आहे, तेव्हापासून आमची त्यांच्याशी जवळीक वाढली आहे, असं फडणवीस मनसेला सोबत घेण्यासंदर्भात म्हणाले. "राज ठाकरे यांनी 2014 पासूनच मोदींना पाठिंबा दर्शवला होता. मोदींना पंतप्रधान केलं पाहिजे अशी जाहीर भूमिका ही त्यांनी घेतली होती. मधल्या काळात त्यांची भूमिका जरी बदलली होती, तरी आज त्यांना ही हे मान्य आहे की मोदींनी भारताचा विकास केला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी मोदींच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. खास करून जे राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहे, ज्यांच्यासाठी समाज व राष्ट्र प्रथम आहे अशा सर्वांनी मोदींसोबत राहिले पाहिजे. म्हणून मला विश्वास आहे की राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीसोबत राहील," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज सायंकाळी मनसेच्या मेळाव्यात राज काय भूमिका घेतात हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.