'खैरेंचं काम करणार नाही, मी...'; उमेदवार यादीतून वगळल्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

Chandrakant Khaire Will Contest From Chhatrapati Sambhaji Nagar Ambadas Danve Reacts: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामधून अंबादास दानवेही उमेदवारीसाठी इच्छूक होते. उद्धव ठाकरेंबरोबर दानवे आणि खैरे यांची बंद दाराआड चर्चाही झाली होती.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 27, 2024, 02:54 PM IST
'खैरेंचं काम करणार नाही, मी...'; उमेदवार यादीतून वगळल्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया title=
खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया

Chandrakant Khaire Will Contest From Chhatrapati Sambhaji Nagar Ambadas Danve Reacts: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने चंद्रकांत खैरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे या जागेवरुन निवडणुकीच्या तिकीटासाठी उत्सुक होते. मात्र उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या 17 उमेदवारांच्या यादीमध्ये चंद्रकांत खैरेंनी उमेदवारी देण्यात येत असल्याची घोषणा पक्षाने केली आहे. या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना दानवेंनी चंद्रकांत खैरेंसाठी आपण काम करणार नसल्याचं म्हटलं आहे. आपण नक्कीच पक्षासाठी काम करु पण कोणत्याही एका ठराविक व्यक्तीसाठी काम करणार नाही असं दानवे म्हणालेत.

शिवसैनिक नक्कीच दिल्लीत पोहचतील

उमेदवारी यादी झाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दानवेंनी, "वर्षभरापासून शिवसेना यासाठी तयारी करत आहे. सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, जनतेची मतं जाणून घेऊन उमेदवारी जाहीर केली आहे. दिल्ली गाठण्यासाठी नश्चितच ही प्रभावी यादी आहे. या यादीतील जास्तीत जास्त शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पोहोचतील. जे आता 400 पार म्हणत आहेत त्यांना तडीपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत हा शिवसेनेचा संकल्प आहे," असं दानवे म्हणाले.

2014, 2019 आणि 2024 लाही उमेदवारीसाठी उत्सुक होतो पण...

पत्रकरांनी दानवेंना, तुम्ही 20 वर्षांपासून जिल्हाप्रमुख आहात. गेल्या 10 वर्षांपासून उमेदवारीसाठी इच्छूक होता. पण पुन्हा एकदा चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली आहे, असं म्हणत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना आपण नक्कीच उमेदवारीसाठी उत्सुक होतो पण आता उमेदवारी मिळाली नसली तर पक्षासाठी काम करणार असल्याचं दानवे म्हणाले. "मी 2014, 2019 आणि 2024 लाही इच्छूक होतो. मी मागील 25 ते 30 वर्षांपासून संघटनेचं काम करतोय. इच्छा असण्यात काही वावगं असणं कारण नाही. मला विधानपरिषदेचं सदस्यत्व, विरोधी पक्षनेते पद अशी महत्त्वाची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी दिली आहे. आम्हाला हट्ट करण्याचा हक्क आहे त्यांना उमेदवार निवडण्याचा हक्क आहे. मी संभाजीनगरपुरता थोडी आहे मी आता उद्धवजींच्या आशिर्वादाने महाराष्ट्राचं काम करतो. सर्वच उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचा आम्ही संकल्प केला आहे," असं दानवे म्हणाले.

नक्की वाचा >> 'मविआ'बरोबर काय बिनसलं? आंबेडकर स्पष्टच म्हणाले, 'त्यांनी 'तो' फॅक्टर लक्षातच घेतला नाही म्हणून..'

40 लोक सोडून गेल्याचा धक्का

तसेच पुढे बोलताना दानवेंनी, "मला पक्षाचं आणि संघटनेचं हित कळतं. पक्षाचं आणि संघटनेचं हित साधलं गेलं तर माझं हित साध्य होती. सध्या माझ्यावर जी जबाबदारी आहे ती पार पाडणं माझं कर्तव्य आहे. संघटनेतले 40 लोक सोडून गेले याचा सर्वांना धक्का बसला आहे. हा धक्का सहन करताना पक्ष प्रमुखांचा मान व मन राखणं ही आमची जबाबदारी आहे," असंही सांगितलं.

नक्की वाचा >> 22 पैकी 17 जागांवरच ठाकरेंचे उमेदवार! 'या' 5 जागांवर 'मशाल' कोणाच्या हाती? संभ्रम कायम

खैरेंसाठी काम करणार नाही

तुम्ही चंद्रकांत खैरेंचं काम करणार का? असा प्रश्न दानवेंना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना. "नाही, मी खैरेंचं नाही शिवसेनेचं, उद्धवजी ठाकरेंचं काम करणार. मी कोणत्याही व्यक्तीचं काम करत नाही. कोणत्याही व्यक्तीशी मला देणंघेणं नाही. मला फक्त शिवसेनाप्रमुखांचा विचार आणि उद्धवजींचं नेतृत्व ऐवढंच प्रिय आहे. त्यांनी जे दिलं आहे ते मी काम करणार. व्यक्तिगत कोणाचं काम करण्याचा प्रश्न नाही. मी शिवसेनाचा शिवसैनिक आहे. पक्षाचं काम करणार. शिवसेना निवडून येणार म्हणजे खैरेच निवडून येणार ना. मी कोणत्याच व्यक्तीसाठी काम करत नाही," असं दानवेंनी सांगिंतलं.