रुममेटने बाथरुममध्ये कोंडून ठेवले, चाकूचा धाक दाखवला; रॅगिंगमुळे अपंग विद्यार्थिनीला ब्रेनस्ट्रोक

Pune Lonavala Ragging Case: लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात रॅगिंगमुळे अपंग विद्यार्थिनीला ब्रेनस्ट्रोक आल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीने वारंवार तक्रार करून देखील महाविद्यालयाकडून संबंधित मुलींनवर कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.  

Updated: Mar 27, 2024, 11:35 AM IST
रुममेटने बाथरुममध्ये कोंडून ठेवले, चाकूचा धाक दाखवला; रॅगिंगमुळे अपंग विद्यार्थिनीला ब्रेनस्ट्रोक title=
Lonavala Ragging Case Disabled Girl Ragged In College Hostel

Pune Lonavala Ragging Case:  रॅगिंग होऊ नये म्हणून शासनाने कायदे केले आहेत. मात्र तरीही रॅगिंगचे प्रकार सुरूच असून महाविद्यालयदेखील या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. लोणावळ्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट या महाविद्यालयात तीन मुलींनी एका अपंग मुलीवर रॅगिंग केले असल्याचा आरोप अपंग विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. रॅगिंग सहन न झाल्याने तिला ब्रेनस्ट्रोक आला असून सध्या या मुलीवरती पिंपरी-चिंचवड शहरातील बिर्ला हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबत मुलीच्या वडिलांनी लोणावळा ग्रामीण पोलीस आणि महिला आयोगाकडे न्यायासाठी दाद मागितली असून चौकशी सुरू असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल असं लोणावळा पोलिसांनकडून सांगण्यात आले आहे.

सातारा तालुक्यातील गरीब कुटुंबातील एक अपंग मुलगी लोणावळा येथील सिंहगड महाविद्यालयात बीबीए/सीए शिक्षण घेत असून सध्या ती दुसऱ्या वर्षाला आहे. ती मुलींच्या वसतिगृहात राहत असून तिच्याच खोलीत राहणाऱ्या अन्य तीन मुलींनी तिच्यावर रॅगिंग केले. तिचे साहित्य व कागदपत्र फेकून देणे, तिला बाथरूममध्ये कोंडून ठेवणे, चाकू घेऊन तिच्या मागे लागणे अशा घटना वारंवार घडल्या आहेत. या घटनांमध्ये या मुलीला दोन वेळा चाकू देखील लागला आहे. रॅगिंगबाबत तिने आपल्या वडिलांना सांगितल्यावर वडिलांनी रॅगिंग करणाऱ्या मुलीच्या पालकांशी संवाद साधला. मात्र त्यापैकी एका पालकाने उर्मट उत्तरे देऊन मी फौजी आहे तुम्हाला काय करायचे ते करा अशी उलट उत्तर दिली. त्यामुळे अपंग मुलीचे आई वडील ही हतबल झाले.

वारंवार होणारा त्रास असह्य झाल्याने त्या मुलीला ब्रेन स्ट्रोक आल्याचे तिच्या वडिलांनी महिला आयोग आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सध्या त्या मुलीवर पिंपरी चिंचवड शहरातील बिर्ला रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जीवाची बाजी लावत अपंग मुलीचे प्राण वाचविले, अनेक स्वप्नं उराशी बाळगून सातारा येथून लोणावळ्यात उच्च शिक्षणासाठी आलेल्या मुलीवर रॅगिंगसारख्या प्रकाराने जीवावर बेतलं असून अजून ही ती धोक्याच्या कक्षात असून या ब्रेन स्ट्रोकमुळे तिच्या शरीराचा एक भाग लुळा पडला आहे..

आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिच्या वडिलांनी 21 मार्च रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस व 23 मार्च रोजी महिला आयोगाला पत्र पाठवले. मात्र याबाबत आमचे अधिकारी चौकशी करीत आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे लोणावळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मात्र या सर्व प्रकाराबाबत कॉलेज प्रशासनाला विचारले असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची ठोस माहिती दिली गेली नाही. त्याचप्रमाणे पोलिसांकडून पत्र प्राप्त झाल्यानंतरच ही माहिती समजली असल्याचे कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आले. या घटनेबाबत संबंधिताना विचारणा केली जाईल अशी माहिती सिंहगड महाविद्यालयाकडून देण्यात आली. तर दुसरीकडे प्रतिक्रिया देण्यास कॉलेज प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली, लोणावळ्यात सिंहगड महाविद्यालयासारख्या नामांकित महाविद्यालयात रॅगिंग सारखा गंभीर प्रकार घडत असताना तसेच याबाबत वारंवार अपंग विद्यार्थिनीकडून कॉलेज प्रशासनाला तक्रार केली जात असताना देखील महाविद्यालयाकडून संबधीत मुलींवर कोणतीच कारवाई केली गेली नसल्याने महाविद्यालय प्रशासन रॅगिंगसारखा गंभीर प्रकार करणाऱ्या मुलींना पाठीशी घालत असल्याचा संशय पीडित मुलींच्या परिवाराने व्यक्त केला आहे.