प्रवासाआधी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लोकांची गर्दी

वॉर्ड कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

Updated: May 7, 2020, 01:33 PM IST
प्रवासाआधी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लोकांची गर्दी title=

आतिश भोईर, डोंबिवली / हेमंत चापुडे, शिरूर :  कोरोना लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सरकारने सवलत दिल्यानंतर स्थानिक प्रशासनाची परवानगी आणि वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता ठिकठिकाणी गर्दी उसळू लागली आहे. तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठीही रुग्णालयात गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सोशल डिस्टसिंगचाही फज्जा उडताना दिसत आहे.

कल्याण, डोंबिवलीमध्ये महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कामगारांनी पहाटे ५ वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कल्याण, डोंबिवलीतील सर्वच प्रभाग कार्यालयात अशी स्थिती होती. ही गर्दी आटोक्यात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे. लोक एकमेकांना खेटून रांगेत उभे राहत असल्याने सोशल डिस्टन्सिंगगचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे कोरोना उपाययोजनांचाही फज्जा उडत असून कोरोना फैलावाचा धोकाही निर्माण होऊ शकतो.

वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अन्य ठिकाणीही अशीच गर्दी उसळत आहे. पुणे जिल्ह्याच्या विविध भागातही परप्रांतीय तसेच राज्याच्या विविध भागातील कामगार अडकले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने त्यांना गावी जाण्याची सवलत जाहीर केल्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली आहे. या कामगारांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नसल्याचे प्रमाणपत्र महत्वाचे आहे. त्यामुळे तपासणी करून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कामगारांनी अशीच गर्दी केली होती.

 

वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्यानंतरच लोकांना गावी जाण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील लोकांसाठी एसटीची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. किंवा खाजगी वाहनानेही प्रवास करता येणार आहे. तर परराज्यात जाण्यासाठी राज्य सरकार गरजेनुसार रेल्वेची व्यवस्था करत आहे.