गडचिरोलीची लेडी ड्रायव्हर किरणच्या स्वप्नांना 'पंख', इंग्लंडला जाऊन घेणार शिक्षण; CM शिंदेंकडून 40 लाखांची स्कॉलरशिप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गडचिरोलीच्या (Gadchiroli) महिला टॅक्सी चालक विद्यार्थिनीला मदत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी समाज कल्याण विभागाला विदेशी शिष्यवृत्तीसाठी 40 लाखांच्या मदतीचे निर्देश दिले आहेत. यामुळे किरण कुर्माचं (Kiran Kurma) विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 31, 2023, 06:55 PM IST
गडचिरोलीची लेडी ड्रायव्हर किरणच्या स्वप्नांना 'पंख', इंग्लंडला जाऊन घेणार शिक्षण; CM शिंदेंकडून 40 लाखांची स्कॉलरशिप title=

महाराष्ट्रातील नक्षल प्रभावित जिल्ह्यातील टॅक्सीचालक विद्यार्थिनी किराण कुर्मा आता उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलेल्या मदतीमुळए किरण कुर्माचं स्वप्न पूर्ण होणार आहे. किरण कुर्माने केलेल्या विनंतीनंतर एकनाथ शिंदे यांनी तिला 40 लाखांची स्कॉलरशिप मंजूर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी समाज कल्याण विभागाला तात्काळपणे तिला विदेशी शिष्यवृत्तीसाठी 40 लाखांच्या मदतीचे निर्देश दिले आहेत. 

किरण कुर्मा सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम रेगुंठा गावात वास्तव्याला आहे. वडिलांचा अपघात झाल्यानंतर किरणने काळी पिवळी टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली. किरण कुर्मा टॅक्सी चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. किरणने हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए केलं आहे. यानंतर तिने विदेशात जाऊन पुढील शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने तिचं हे स्वप्न रखडलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी क्षणात तिला मदत दिली. यानंतर कुर्मा कुटुंबीय गहिवरलं आहे. 

इंग्लंडला जाऊन मार्केटिंगचा कोर्स करण्याचा निर्णय

किरणने इंग्लंडला जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी किरणला लाखो रुपयांची गरज होती. यासाठी तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. 

एकनाथ शिंदेंकडे शिक्षण खर्चासाठी मागितली होती मदत

किरणला आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याची इच्छा होती. यासाठी ती आपल्या मित्रांसह विधानभवनात पोहोचली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी आपल्या कार्यालयातच होते. किरण एकनाथ शिंदेंसमोर विदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करत आपला अर्ज त्यांच्याकडे सोपवला होता. 

एकनाथ शिंदेंनी तिथेच मंजूर केली 40 लाखांची स्कॉलरशिप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जराही वेळ न घालवता समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना फोन केला आणि किरणला मंत्रालयात जाण्यास सांगितलं. किरण सचिवांपर्यंत पोहोचण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून अर्ज पाठवला होता आणि 40 लाखांची स्कॉलरशिप मंजूर केली होती. 

टॅक्सी चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह

किरण टॅक्सी चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. किरणकडे एकूण 3 टॅक्सी आहेत. दरम्यान किरण आता लंडनला जाऊन इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंटचा कोर्स करणार आहे. हा कोर्स 1 वर्षाचा आहे. दरम्यान तिथे 2 वर्ष एखाद्या कंपनीत काम केल्यानंतर ती पुन्हा स्वदेशी परतणार आहे.