वांद्रे गर्दी प्रकरण : सोशल मीडियावरील ३० अकाऊंटवर सायबर सेलची कारवाई

टिकटॉक , फेसबुक , ट्विटर आणि अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष 

Updated: Apr 15, 2020, 07:05 PM IST
वांद्रे गर्दी प्रकरण : सोशल मीडियावरील ३० अकाऊंटवर सायबर सेलची कारवाई  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर  सेलने राज्यात २०१ तर, बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २६ गुन्हे दाखल केले आहेत. त्याशिवाय मंगळवारी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची मुदत वाढल्याचं जाहीर केल्यानंतर मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर उसळलेल्या गर्दी प्रकरणीही धडक कारवाई केली आहे. ज्याअंतर्गत सोशल मीडियावरील जवळपास ३० अकाऊंटवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. 

अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यामध्ये काही गुन्हेगार, समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर, याच समाजकंटकांना पकडण्यासाठी राज्यात सर्वत्र समन्वय ठेवून आहे.  महाराष्ट्र सायबर विभाग टिकटॉक , फेसबुक , ट्विटर आणि अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.  

आतापर्यंत कुठे, किती गुन्हे नोंदवले गेले? 

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये २०१ गुन्हे १४ एप्रिल २०२० पर्यंत दाखल झाले आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक २६ गुन्हे बीड जिल्ह्यात नोंदवण्यात आहेत. कोल्हापूर १५, जळगाव १३, पुणे ग्रामीण ११, मुंबई १०, सांगली १०,जालना ९, नाशिक ग्रामीण ८ , सातारा ७, नांदेड ७, परभणी ७, नाशिक शहर ६, नागपूर शहर ५, सिंधुदुर्ग ५ , ठाणे शहर ५, बुलढाणा ४, पुणे शहर ४, लातूर ४, गोंदिया ४, सोलापूर ग्रामीण ५, सोलापूर शहर ३. नवी मुंबई २, उस्मानाबाद २, ठाणे ग्रामीण १, धुळे १ असे दगुन्हे नोंदवले गेले आहेत. 

 

दाखल करण्यात आलेल्या सर्व गुन्ह्यांचे  विश्लेषण असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ९९ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ६६ गुन्हे दाखल करण्यात आले.  Titktok विडिओ शेअर प्रकरणी ३ तर ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ३७ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत ३७ आरोपींना अटक केली आहे .