राज्यभरात आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप

राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे.

Updated: Sep 12, 2019, 11:16 PM IST
राज्यभरात आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप title=

मुंबई : अकरा दिवसांच्या पाहुणचारानंतर राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. मुंबई-पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. गणेश विसर्जनालाही भाविकांनी अलोट गर्दी केली. पालिका आणि पोलिस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त दिवसभर पाहायला मिळाला. उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये याची तंतोतंत काळजी घेण्यात आली होती.मोठमोठ्या मूर्तींसाठी मुंबईचा गणेशोत्सव ओळखला जातो... सकाळपासून सुरू असलेली बाप्पाची मिरवणूक थेट पहाटेपर्यंत सुरू असते. संध्याकाळनंतर तर या मिरवणुकीला अधिकच रंग भरतो. लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये बाप्पाच्या मूर्तींची चौपाट्यांच्या दिशेनं मार्गक्रमणा सुरू असते.

गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची अफाट गर्दी झाली. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी संध्याकाळनंतर मुंबईकरांची गर्दी वाढली.मोठ्या उत्सहात ठाणेकरांनी आपल्या बाप्पाला निरोप दिला. ढोलताशाच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. काही ठिकाणी भजनी मंडळांनी ताल धरला होता. विशेष म्हणजे कृत्रिम तलावात गणरायाचं विसर्जन करण्यात आलं.

कल्याणमध्ये चौकाचौकात पुष्पवृष्टी 

कल्याणमधील गणेश घाट आणि डोंबिवलीतील रेतीबंदर इथं वाजतगाजत गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. पोलिसांनी मोठा चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी चौकाचौकात बाप्पावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला.

पुण्यनगरीत रथांमधून बाप्पा 

मानाच्या गणपतींचं संध्याकाळी विसर्जन झाल्यानंतर पुण्याची मिरवणूकत मार्गस्थ झालीये... अंधार पडल्यानंतर सुरू होते ती विसर्जन मिरवणुकीतील रंगांची उधळण... रंगीत दिव्यांची आकर्षक सजावट केलेल्या रथांमधून बाप्पा गावाला जातात... हा नजरा बघण्यासारखा असतो. पुण्याची ही मिरवणूक बघण्यासाठी देशविदेशातून हजारो लोक पुण्यनगरीमध्ये येतात.

साताऱ्यात ताशांचा गजर 

सातारा नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यात घरगुती आणि गणेश मंडळाच्या मोठ्या मुर्तींचे १०० फुटी क्रेनच्या साह्याने विसर्जन करण्यात आले. डॉल्बीला फाटा देत डोल ताशाच्या गजरात मानाचा सम्राट गणपती बाहेर पडल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. अधूनमधून पावसाचा व्यत्यय येत असला तरी मिरवणुकीत खंड पडला नाही.

रत्नागिरीत पारंपारिक नाच 

रत्नागिरीतही अकरा दिवसांच्या मुक्‍कामानंतर बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. जिल्ह्यात 38 हजार घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे विसर्जन आज करण्यात आलं. गुहागर तालुक्यात गणपती विसर्जनासाठी गणपती समुद्रावर नेल्यानंतर विसर्जनापूर्वी लाडक्या बाप्पासमोर पारंपरिक नाच केला जातो. यावेळी पौराणिक गाणी म्हणत अख्ख गाव या नाचात सहभागी होतं. अगदी महिला वर्ग देखील यावेळी फेरा धरतात.

मंगेशकरांचा बाप्पा 

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या घरच्या बाप्पाचंही विसर्जनही वाजतगाजत करण्यात आलं. ढोलताशाच्या गजरात ठेका धरला. अतिशय भावपूर्ण वातावरणात उषा मंगेशकरांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

चारजण बेपत्ता 

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे गणेश विसर्जन दरम्यान नदी पात्रात चार जण बुडाले असल्याची घटना आज सायंकाळी घडली. घटनास्थळी रेस्क्यू पथक पोहचले असून अद्यापही बुडालेल्या गणेश भक्तांचा शोध लागला नाही.