लोकसभेवरुन महायुतीत वादाची ठिणगी? कारण ठरलं उदय सामंतांच्या भावाचं WhasApp स्टेटस

Maharashtra Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा असल्याची चर्चा सुरु झाल्याने महायुतीमध्ये वाद सुरु होण्याची शक्यता आहे. भाजप या मतदारसंघातून मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 1, 2024, 01:48 PM IST
लोकसभेवरुन महायुतीत वादाची ठिणगी? कारण ठरलं उदय सामंतांच्या भावाचं WhasApp स्टेटस title=
(फोटो सौजन्य - PTI)

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : नवीन वर्षात महायुतीमध्ये वाद होण्याची चिन्ह दिसतायत. याची सुरुवातच तळकोकणातून होणार असल्याची शक्यता दिसतेय. कारण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करण्याच्या तयारीत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या भाजप तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठांचे आदेश असल्याचंही सूत्रांकडून समजतंय. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करतायत. त्याचमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.

महायुतीतल्या वादाचा पहिला अंक तळकोकणातून सुरु झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कारण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच मंत्री रवींद्र चव्हाण यांना या लोकसभा मतदारसंघातूनउतरवण्याची भाजपची तयारी असल्याचे म्हटलं जात आहे. दुसरीकडे या जागेसाठी शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. किरण सावंत यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरुनही याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 'रोकेगा कौन?' अशा आशयाचा स्टेटस किरण सामंत यांनी ठेवला आहे.

रवींद्र चव्हाण मला मोठ्या भावाप्रमाणे - किरण सामंत

"रवींद्र चव्हाण हे मला मोठ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांना तिकीट दिल्यास मी त्यांचा जोराने प्रचार करेन. तसेच महायुतीतील प्रमुख नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. तसेच सर्वांनी पाठिंबा दिल्यास खासदार महायुतीचा असेल," असे स्पष्टीकरण किरण सामंत यांनी दिलं आहे.

दरम्यान, कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असतो. मात्र सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत सिंधुदुर्गचे खासदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीत शिंदे गटाला मिळेल, असे शक्यता होती. मात्र, भाजपने आपल्या मंत्र्याला या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र आता भाजप रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.