महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूंकप? शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीत

Maharahtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार थेट  गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले. अजित पवारांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार का याची चर्चा सुरु झाली आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 10, 2023, 06:53 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूंकप? शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीत title=

Maharashtra Politics : पुण्यात शरद पवारांचे (Sharad Pawar) भाऊ प्रतापराव पवार यांच्या घरी पवार कुंटुब एकत्र आलं आणि महाराष्ट्राच्या राजकराणात पुन्हा काका पुतण्या एक होणार का याची जोरदार चर्चा सुरु  झाली. कांकाच्या भेटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) तातडीने दिल्लीला रवाना झाले. अजित पवार गटाची आज दिल्लीत बैठक आहे. तसंच अजित पवार गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. या भेटीमागचं कारण अद्याप समजू शकले नाही. पण, शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या हाताळणीवरुन अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसंच, अजित पवारांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यामुळे मुख्यमंत्री बदलाची चर्चाही पुन्हा सुरू झाली आहे

दिवाळी निमित्त संपूर्ण पवार कुटुंब एकत्रित येतं. यंदा अजित पवारांनी पक्षावर दावा ठोकल्यानंतर पवार कुटुंबियासोबत पहिल्यांदाच कार्यक्रमात सहभाग घेतला. सुप्रीम कोर्ट असो की निवडणूक आयोग खासदार सुप्रिया सुळे कधीही अजित पवार यांच्यावर टिका करताना दिसल्या नाहीत. यावरून पवार कुटुंबाची जवळक दिसून येते.

अजित पवार भाजप सोबत गेल्यापासून शरद पवारांनाही एनडीए मध्ये आणण्याच्या हालचाली जोरात सुरू झाल्या होत्या. दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला शरद पवारांनी यावं यासाठी प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार शरद पवारांचे मन वळवण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात गेले होते. पण पवारांनी एनडीएच्या बैठकीकडे न जाता इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभाग घेतला. अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीनं पुन्हा हाच मुद्दा चर्चेला येत आहे. शरद पवारांना एनडीएत आणण्याचे प्रयत्न यशस्वी होणार का ?

शिवाय अजित पवार गेल्या काही दिवसांपासून सक्रीय नव्हते. मराठा आरक्षणात त्यांनी भूमिका घेतली नाही. त्यामुळे भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.  अजित पवार नाराज का आहेत याचं कोडं अद्याप उलगडलं नाहीये. अमित शाहांच्या भेटीतून अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.

शरद पवारांचे सूचक वक्तव्य
अजित पवार यांची तब्येत लवकर सुधारतेय, याचा आनंद आहे, अशी एका ओळीची सूचक प्रतिक्रिया या भेटीनंतर शरद पवार यांनी दिली आहे. ही भेट कौटुंबिक होती, असं शरद पवार यांनी म्हटले असले तरी त्यांच्याही वाक्याचा आता वेगळा अर्थ काढला जात आहे. दरम्यान, अजित पवार यांना डेंग्यू झाला होता. त्यातून आता ते बरे झाले आहेत. परंतु सार्वजिनक कार्यक्रमास ते जात नाही.

दिलीप वळसे पाटील-शरद पवार भेट
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आणि अजित पवार गटाचे नेते सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वळसे पाटील मोदीबाग इथं गेले होते. शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणुन दिलीप वळसे पाटील यांची राजकारणात आधीपासूनच ओळख आहे. दिवाळी निमीत्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांसोबत चर्चा देखील केली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीमुळे संभ्रम निर्माण होण्याचं कारण नसल्याचं वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.