महाराष्ट्रातील 'या' गावाला लाभलाय निसर्गाचा चमत्कार, गिनीज वर्ल्ड बुकमध्येही नोंद

Maharashtra Village: महाराष्ट्रातील अशी एक जागा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या जागेला निसर्गाचा भौगोलिक चमत्कारही म्हणता येऊ शकतो. पाहा कुठे आहे ही जागा 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 23, 2024, 05:46 PM IST
महाराष्ट्रातील 'या' गावाला लाभलाय निसर्गाचा चमत्कार, गिनीज वर्ल्ड बुकमध्येही नोंद title=
maharashtra village World Famous Natural Potholes in ahmednagar nighoj known as Ranjankhalge

Maharashtra Village: महाराष्ट्राला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. सह्याद्रीतील नानाविध पर्यटन स्थळे पाहण्यास पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात व हिवाळ्यात गड-किल्ल्यांवर ट्रॅकिंगसाठी हौशी पर्यटकही गर्दी करतात. पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे ज्याला निसर्गाचा भौगोलिक चमत्कार लाभला आहे. 

महाराष्ट्र हा वैविध्याने नटलेला आहे. मात्र, अजूनही अशी काही ठिकाणं आहेत जी अद्यापही दुर्लक्षित आहेत. त्यातीलच एका ठिकाणाबाबत आम्ही सांगणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यात एक गाव आहे या गावातून वाहणाऱ्या कुकडी नदीत हा भौगोलिक चमत्कार घडला आहे. गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेले हे ठिकाण गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आलं आहे. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरनेही या ठिकाणाला भेट दिली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील निघोज या गावात हा भौगोलिक चमत्कार आहे. या ठिकाणी ज्वालामुखीपासून तयार झालेला बेसॉल्ट खडकाच्या आड एक थर आहे. त्यातून कुकडी नदी वाहते. मात्र, या खडकांमध्ये एक रुंद दरी तयार झाली आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाहाने नदीपात्रात पाषणाशिल्प तयार झाले आहेत. या खडकांना रांजणासारखा आकार प्राप्त झाल्याने या ठिकाणाला रांजणखळगे असं म्हटलं जातं. त्यामुळं परिसरात निघोजचे रांजणखळगे म्हणून प्रसिद्ध आहेत. 

निघोजच्या रांजणखळग्यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. त्यामुळं हल्ली जगभरातील शास्त्रज्ञ आणि पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. कुकडी नदीच्या पात्रात असे अनेक रांजणखळगे असून ते खोल आहेत. नदीपात्रातील कठीण आणि मऊ खडकाचे स्तर आहेत. नदी पात्रात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड वाहून येतात. दगड आणि खडक यांच्यात सतत होणाऱ्या घर्षणामुळं मऊ खडक झिजतो आणि कठिण खडकाचा भाग तसाच राहतो. लाखो वर्षांपासून ही क्रिया होत आहे. या क्रियेमुळं या नदीपात्रात रांजणखळगे तयार झाले आहेत, असं संशोधकांचे म्हणणे आहे. 

रांजणखळग्यांतून खळाळणारे पाणी पाहून मन प्रसन्न होतं. या ठिकाणाचे सौंदर्य पाहण्यासाठी इथे एक झुलता पुलही बांधण्यात आला आहे. त्यामुळं पर्यटक या जागेचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात. वेगवेगळ्या कोनातून हे सौंदर्य पाहता येऊ शकते. 

निघोज गावहेच कुकडी नदीच्या काठावर वसलेले आहे, हे गाव आणि गावातील निवासस्थानेही पाहण्यासारखे आहेत. गावाचं ग्रामदैवत असलेले देवस्थान म्हणजे मळगंगा देवीचं मंदिर आहे. या देवळापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. नदीचा खळखळता प्रवाह आणि रांजणखळग्यातून येणारे पाणी आणि त्याचा आवाज हे दृश्य खूपच मनोहारी आहे. पावसाळ्यात तर परिसर अतिशय सुंदर दिसतो.