Maharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन

Maharashtra Weather News : कोकणच्या समुद्रावरूनही वाहणार उष्ण वारे... पाहा हवामानात झालेले बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा करणार परिणाम...   

सायली पाटील | Updated: Apr 17, 2024, 07:43 AM IST
Maharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन  title=
Maharashtra Weather news heatwave predictions in Konkan region alert issued know latest updates

Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान 37 अंशांच्याही पलिकडे पोहोचलं असून, (Mumbai) मुंबई, ठाणे (Thane), पालघरमध्येही मंगळवारपासूनच उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळचे काही तास वगळलं असता दिवस पुढे सरतोय तसतसा सूर्याचा प्रकोप आणखी वाढताना दिसत आहे. ज्यामुळं आता राज्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन दिलं जात आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर, मुंबईतही पारा 40 अशांच्या पलिकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमानाच होणारी ही लक्षणीय वाढ पाहता नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा इशारा हवामान विभागासर आरोग्य विभागानंही दिला आहे. दरम्यान, कोकणाव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्ण रात्रींचा यलो अलर्टही देण्यात आला आहे. 

राज्याच्या काही भागांमध्ये  ढगाळ वातावरण असलं तरीही उष्णतेचा दाह मात्र तसुभरही कमी होताना दिसणार नाही, ज्यामुळं उष्णतेपासून तूर्तास दिलासा नाही हेच आता स्पष्ट आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि  विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास वेग) हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेसुद्धा वाचा : Monsoon 2024 : बळीराजासाठी आनंदाची बातमी! यंदा वरुणराजा सरासरीहून अधिक बरसणार.. IMDची माहिती

 

उष्माघाताचा पहिला बळी 

राज्यात तापमान वाढत असतानाच आरोग्यावरही त्याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा वाढला असून, इथं एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, राज्यात उष्माघाताच्या पहिल्या बळिची नोंद करण्यात आली आहे. आई वडिलांना शोधण्यासाठी नदीवर गेलं असता तिथंच अश्विनी विनोद रावते या मुलीला भोवळ येऊन तिचा मृत्यू ओढावला. 

देशातील हवामानावर एक नजर 

'स्कायमेट' या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार देशातील हवामानातही मोठे बदल अपेक्षित असून पूर्वोत्तर भागात येणाऱ्या अरुणाचल प्रदेश आणि नजीकच्या भागात हलक्या बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, हिमालयाच्या पश्चिमेकडील क्षेत्रामध्ये हलक्या हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नव्या पश्चिमी झंझावातामुळं देशाच्या पश्चिम हिमालय क्षेत्रामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, तर पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा या भागात सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.