Maharashtra Weather News : काळजी घ्या! ताशी 40 ते 50 किमी वेगाच्या वाऱ्यांसह राज्यात वादळी पावसाचा इशारा, 'इथं' यलो अलर्ट

Maharashtra Weather News : राज्यात सुरु असणारं वादळी पावसाचं सत्र आता थांबण्याचं नाव घेत नाहीय. त्यातच पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागानं अतीव महत्त्वाचा इशारा दिला आहे.   

सायली पाटील | Updated: May 17, 2024, 06:51 AM IST
Maharashtra Weather News : काळजी घ्या! ताशी 40 ते 50 किमी वेगाच्या वाऱ्यांसह राज्यात वादळी पावसाचा इशारा, 'इथं' यलो अलर्ट  title=
Maharashtra Weather News storm winds and heavy rain predictions latest update

Maharashtra Weather News : मे महिन्याचा पहिला पंधरवडा पूर्ण होत असतानाच महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांनी थैमान घालण्यास सुरुवात केली. या वादळी वाऱ्यांचा परिणाम पुढील काही दिवस कायम राहणार असून, दरम्यानच्या काळात मान्सूनसाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. राज्यात सध्याच्या घडीला बहुतांश भागांमध्ये पूर्वमोसमी वारे वाहण्यास सुरुवात झाली असून, त्याच्या परिणामस्वरुप अनेक भागांमध्ये  हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. तर, काही भागांमध्ये मात्र दुपारपर्यंत सूर्याचा दाह अधिकच वाढताना दिसत आहे. 

मुंबई आणि ठाण्यासह कोकण किनारपट्टी भागातही हेच चित्र पाहायला मिळत असून, पुढील 24 तासांमध्ये उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. याशिवाय इथं काही क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यताही आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. साधारण 40-50 किमी प्रतितास वेगानं वाहणाऱ्या या वाऱ्यांसोबत इथं हलका ते  माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील 24 तासांसाठी राज्यात वादळी पावसाचा इशारा असून, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. दिवस मावळतीला गेल्यानंतर हे बदल दिसणार असून, दिवसभर मात्र इथं प्रचंड उकाडा जाणवणार आहे. तर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात  पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.