शरद पवार रोज फोन करतात? मनोज जरांगेंचा मोठा खुलासा, 'मला राज, उद्धव ठाकरे...'

देवेंद्र फडणवीसांमुळे (Devendra Fadnavis) मला मरण यायला लागलं आहे असं मोठं विधान मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलं आहे. तसंच प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) मनोज जरांगे यांना रोज फोन करतात या आरोपावरही उत्तर दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 27, 2024, 12:25 PM IST
शरद पवार रोज फोन करतात? मनोज जरांगेंचा मोठा खुलासा, 'मला राज, उद्धव ठाकरे...' title=

Maratha Reservation: मी आता जेलमध्ये जायला तयार आहे. ज्याला कलंक नाही तो भीतच नसतो. मी सटकणार नाही, तर तुमच्या समोरुन जाणार. माझी मान कापली, जेलमध्ये गोळ्या घातल्या तरी भीत नाही. मराठा समाजासाठी मला पवित्र मरण येईल असं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसमुळे (Devendra Fadnavis) मला मरण यायला लागलं आहे असा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला. छत्रपतींवरही एक वार झाला होता अशी आठवण यावेळी त्यांनी करुन दिली. 

'जर आई-बहिण काढत असेल...', फडणवीसांच्या त्या विधानावर जरांगे संतापले, 'जेव्हा आमच्या आयांच्या छाताडावर...'

 

प्रवीण दरेकर यांनी शरद पवार मनोज जरांगेंना रोज फोन करतात असा आरोप केला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना मनोज जरांगे यांनी सांगितलं की, "मी कोणाचीच मदत घेतली नाही. जे कोणी मला भेटण्यासाठी येत होते, त्यांना भेटत होतो. मला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर, एकनाथ शिंदे, अजित पवार, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रामदास आठवले अशा सर्वांचीच साथ आहे. पण मदत कोणाचीच नाही आहे". 

मराठा समाजासाठी लढताना मृत्यू झाला तर, असलं मरण येण्यास भाग्य लागतं असंही ते म्हणाले. तसंच देवेंद्र फडणवीस सर्व मराठा आमदारांना हाताशी धरुन मला मारणार आहे. मी हसत मरेन, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका - 

"आमच्या आया-बहिणीच्या छाताडवर नाचलात, गोळ्या घातल्या तेव्हा वाईट वाटलं नाही का? आणि आज वाईट वाटत आहे. आमच्या आई-बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिला आणि वरुन हाणलं. 20 पोलीस एका महिलेला मारहाण करत होते. उचलून आपटता का, विटा डोक्यात हाणता त्याच्या. तुमची आई म्हटलं तर किती लागलं. आमच्या आया-बहिणी उभ्या चिरल्यात तेव्हा कुठे गेला होता एसआटी नेमणारा?", अशी टीका त्यांनी फडणवीसांवर केली.

"सत्ता हातात आली म्हणून त्याचा दुरुपयोग करु नका. मी पळून जाणाऱ्यातला नाही. मराठ्यांच्या आय़ा-बहिणीवर हात उचलून देणार नाही. मला हवं तर जेलमध्ये टाका, मी 50 वर्षं शिक्षा भोगायला तयार आहे. आमच्या आया-बहिणीच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या. चारही बाजूला टाके आहेत, पाय मोडले आहेत. तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का? आई-बहिणी सगळ्यांच्या आहेत, त्यांचं रक्षण करा. जर कोणी विरोधात बोलत असेल तर माफ करु नका. याच्या हातात सत्ता आहे म्हणून एसआयटी नेमण्यास लगेच परवानगी दिली.  मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे," असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. 

"काही आमदार बाकडे वाजवत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे. आपल्या जातीच्या पाठीशी उभे राहा. मी मरायला तयार आहे. फासावर जाण्यासही तयार आहे. पण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही. फक्त मराठ्यांनी अर्ध्यातून मागे हटू नका. माझ्या पाठीशी उभे राहा," असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.