मनोज जरांगेंच्या लढ्याला गालबोट, आरोप करणाऱ्यांना सरकारचं पाठबळ?

Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. कधीकाळी जरांगेंचे खास सहकारी असलेल्या मंडळींनीच त्यांच्यावर गंभीर आरोपांची चिखलफेक सुरू केलीय.

राजीव कासले | Updated: Feb 22, 2024, 04:53 PM IST
मनोज जरांगेंच्या लढ्याला गालबोट, आरोप करणाऱ्यांना सरकारचं पाठबळ? title=

Maratha Reservation : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर विजयाचा गुलाल उधळला गेला. मात्र आता त्याच मराठा आंदोलनात (Maratha Aandolan) आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झालीय. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषणाचं हत्यार उपसणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनीच गंभीर आरोप केलेत. जरांगे पाटील हा शरद पवारांचा (Sharad Pawar) माणूस असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडेंनी केलाय. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं मग आता आंदोलनाची गरज काय? असा सवालही त्यांनी केलाय. 

काय म्हणाल्या संगीता वानखेडे?
मनोज जरांगे हा शरद पवारांचा माणूस असल्याचा खळबळजनक आरोप संगीता वानखेडेंनी (Sangeeta Wankhede) केलाय. शरद पवार यांचा  पक्ष संपला आहे, आणि शरद पवार यांनी हा माणूस उभा केला आहे. कारण हा सगळ्यांना शिव्या घालतो, पण शरद पवार यांना कधीच चुकीचं बोलत नाही असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे. 

अजय बारसकरांचा हल्लाबोल
कधीकाळी मनोज जरांगेंचे खास समर्थक असलेल्या अजय महाराज बारसकरांनी (Ajay Baraskar) आरोपांची पहिली तोफ डागली. जरांगे हेकेखोर आहेत, ते दररोज पलटी मारतात, असा हल्ला चढवतानाच सरकारसोबत झालेल्या गुप्त बैठकांमध्ये नेमकं काय झालं, असा सवाल बारसकरांनी केला होता. 

मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
हा सरकारचा ट्रॅप आहे. या आरोप सत्रामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा प्रत्यारोप जरांगेंनी केलाय. अजय महाराज बारसकरांमागे मुख्यमंत्र्यांचा प्रवक्ता आणि देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadanvis) मोठा नेता असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय. सरकारनं मात्र जरांगेंच्या प्रत्यारोपांचा सपशेल इन्कार केलाय. मुख्यमंत्र्यांना असं करण्याची गरज काय, असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी (Sanjay Shirsat) जरांगेंना केलाय. 

कधीकाळी जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकत्रितपणे विजयाचा गुलाल उधळला होता. आता मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा शिंदे सरकारनं मंजूर करून घेतला. मात्र जरांगे ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवण्याच्या मागणीवर ठाम असल्यानं तिढा कायम आहे. सगेसोयऱ्यांच्या मागणीवरही जरांगे ठाम आहेत. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजानं जरांगेंच्या पाठीशी ताकद उभी केली. आता त्याच आंदोलनातल्या जुन्या सहकाऱ्यांनी जरांगेंनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. त्यामुळं जरांगेंच्या आजवरच्या यशाला गालबोट लागलंय, एवढं नक्की...