मनोज जरांगे आज आंदोलन मागे घेणार? मोठं विधान, म्हणाले 'महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हातात...'

सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ कशासाठी हवा आहे अशी विचारणा केली आहे. त्यातच आज दुपारी मराठा समाज आंदोलकांची बैठक पार पडणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 12, 2023, 09:41 AM IST
मनोज जरांगे आज आंदोलन मागे घेणार? मोठं विधान, म्हणाले 'महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हातात...' title=

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 15 दिवसांपासून उपोषण करत आहेत. सोमवारी जरांगे यांनी तपासणी करण्यास आणि वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला होता. पण गावकऱ्यांनी हट्ट केल्याने अखेर त्यांनी सलाईन घेतली. सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ कशासाठी हवा आहे अशी विचारणा केली आहे. त्यातच आज दुपारी मराठा समाज आंदोलकांची बैठक पार पडणार आहे. यानंतर मनोज जरांगे पुढील भूमिका जाहीर करु शकतात. दरम्यान, झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत मनोज जरांगे यांनी जोवर लोकांच्या हातात आरक्षणाचं पत्र पडत नाही तोवर मी आंदोलन मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. 

"आज एक शिष्टमंडळ येणार आहे, पण त्याच्यात कोण आहेत त्यांची नावं कळलेली नाहीत. चर्चा केल्याशिवाय मार्ग निघणार नाही. चर्चेचे सर्व दरवाजे खुले आहेत. पण आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. मराठ्यांनी निवांत राहायचं, अजिबात ताण घ्यायचं नाही. जोपर्यंत तुमच्या हातात आरक्षणाचं पत्र पडत नाही तोवर मी आंदोलन मागे घेणार नाही," असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे. 

"मी याआधीही त्यांना वेळ दिला होता. मी वेळ देतोय पण मागे हटणार नाही. अजिबात संभ्रमात राहायचं नाही. महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हातात पत्र पडल्याशिवाय मी आंदोलन बंद करत नाही. तुम्ही फक्त आरक्षणावर लक्ष्य केंद्रीत करा," असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. 

"जे गाव महाराष्ट्रासाठी लढत आहे त्यांनी या 15 दिवसात माझ्याकडे काही मागितलेलं नाही. पण आता दोन महिन्याच्या लेकरालाही आंदोलनात घेऊन आले आहेत. महिला, सगळ्या गावाने चूल बंद केली असून, आम्हीपण जेवणार नाही म्हणत आहेत. आम्हाला तुम्हीही पाहिजे, आणि आरक्षणही पाहिजे असं ते म्हणत आहेत," असं मनोज जरांगे म्हणाले. 

दरम्यान सोमवारी मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजास सरसकट आरक्षण देण्यात यावे, ही आपली मागणी आहे.  राज्य सरकार मराठवाडय़ातील आरक्षणाच्या संदर्भात ज्यांच्याकडे निजामकालीन पुरावे  आहेत त्यांना आरक्षण देणार असेल तर पश्चिम महाराष्ट्राने तुमचे घोडे मारले आहे काय?

"मराठा समाज आणि पोरांना न्याय द्यावा,आमचा कुणीही समितीत असणार नाही. सरसकट गुन्हे मागे घेतले असतील तर सरकारचं मराठा समाजाकडून स्वागत. मी सरकार, विरोधक कुणालाही घाबरत नाही. मराठ्यांना घाबरतो आणि दबतो. आता माझ्यात निर्णय घेण्याची क्षमता राहिलेली नाही. सरकारला कशासाठी वेळ हवा हे बघतो. त्यांचाही कुणीतरी माझ्याकडे येईल. तुम्ही खरोखर टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ मागताय की आंदोलन मोडून काढण्यासाठी वेळ मागताय हे आम्हाला कळायला हवं. सरकार टिकणारं आरक्षण देणार असेल तर सरकारला आणखी वेळ द्यायला तयार," असंही ते म्हणाले होते.