'जरांगे हा शरद पवार यांचा माणूस' बारसकर यांच्यानंतर आणखी एका सहकाऱ्याचा गंभीर आरोप

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचे साथीदार असणाऱ्या अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता आणखी एका सहकाऱ्याने जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

राजीव कासले | Updated: Feb 22, 2024, 02:22 PM IST
'जरांगे हा शरद पवार यांचा माणूस' बारसकर यांच्यानंतर आणखी एका सहकाऱ्याचा गंभीर आरोप title=

Maratha Reservation : सगेसोयऱ्यांची अधिसूचना लागू करा या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यार त्यांचे जुने सहकारी आणि किर्तनकार अजय बारसकर (Ajay Baraskar) यांनी गंभीर आरोप केले होते. जरांगे पाटील हेकेखोर असल्याचं सांगत त्यांनी संत तुकारामांचा अपमान केल्याचा बारसकर यांनी केलाय. तसंच मुंबई मोर्चावेळी शेवटच्या दोन गुप्त बैठकांमध्ये काय झालं हे मनोज जरांगेंनी स्पष्ट करावं, जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही जरांगे हेकेखोर असून ते दररोज पलटी मारतात असा आरोपही बारसकरांनी केलाय.

आणखी एक सहकारी समोर
अजय बारसकर यांच्यानंतर आता आणखी एका सहकाऱ्याने मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडेंनी (Sangeeta Wankhede) जरांगेंवर गंभीर आरोप केलेत. मनोज जरांगेंनी महाराष्ट्राला वेडं बनवलं, आरक्षण मिळालं मग आंदोलनाची गरज काय? असे सवाल वानखेडेंनी जरांगेना विचारलेत. सुरुवातीला मनोज जरांगे यांच्यावर विश्वास ठेवला, कारण ते भोळा भाबडा माणूस असल्याचं वाटलं होतं, मनोज जरांगेंची बाजू घेऊन छगन भुजबळ यांनाही ट्रोल केलं. 

पण आता  कळलं मनोज जरांगे काय आहेत. मनोज जरांगे हा शरद पवार यांचा माणूस आहे. शरद पवार जसं सांगतात तसं जरांगे करतात, शरद पवारांचे त्यांना फोनही येतात, असा गंभीर आरोप वानखेडेंनी केलाय. पुण्यात मनोज जरांगेंचे ज्यांना बॅनर लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते असं खुलासाही वानखेडे यांनी केलाय.

मागणी काय होती मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची, आता आरक्षण मिळालं, मग दुसऱ्याच्या ताटातलं का घेताय? येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काहीतरी करायचं, कारण शरद पवार यांचा  पक्ष संपला आहे, आणि शरद पवार यांनी हा माणूस उभा केला आहे. कारण हा सगळ्यांना शिव्या घालतो, पण शरद पवार यांना कधीच चुकीचं बोलत नाही असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे. 

मनोज जरांगेंनी महाराष्ट्राला वेडं बनवलं, दंगल घडली की घडवली याचा सरकाराने शोध लावावा, आंतरवालीत पोलिसांकडून लाठीमार झाला, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक झाला. तेव्हापासून मी जरांगे यांच्यासोबत काम करतेय. असंही संगीता वानखेडे यांनी म्हटलंय.

जरांगे यांचा फडणवीसांवर आरोप
दरम्यान, जरांगे-पाटलांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत. अजय महाराज बारसकरांमागे मुख्यमंत्र्यांचा प्रवक्ता आणि देवेंद्र फडणवीसांचा मोठा नेता असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय. 

छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
वयोवृद्धांनीही उपोषण करा या जरांगेंच्या आवाहनावर मंत्री छगन भुजबळांनी हल्लाबोल केलाय. उपोषण करताना कुणा वृद्धाला काही झालं तर जबाबदारी जरांगेंची असेल असा घणाघात भुजबळांनी केलाय..