'देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली'; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Milind Deora News Today:  मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या काँग्रेस नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांने खळबळजनक दावा केला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 14, 2024, 01:10 PM IST
'देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली'; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा title=
milind deora resignation timing of announcement determined by pm modi said congress leader

Milind Deora News Today: माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोठचिठ्ठी दिल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा पहिला दिवस असतानाच मिलिंद देवरा यांनी राजीनामा देत मोठा धक्का दिला आहे. मिलिंद देवरांच्या या राजीनाम्याच्या टायमिंगवरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 

काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी रविवारी मिलिंद देवरा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मिलिंद यांच्या पक्ष सोडण्याच्या घोषणेचा वेळ पंतप्रधान मोदींनी ठरवला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, शुक्रवारीच माझे देवरांसोबत फोनवर बोलणे झाले. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, मुंबई दक्षिण मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दावा सांगितला आहे. याबाबत राहुल गांधी यांच्यासोबत सविस्तर बोलणं करायचं आहे. 

जयराम रमेश यांनी पूर्ण घटनाक्रमच सांगितला आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, त्यांनी मला शुक्रवारी सकाळी 8.52 रोजी मेसेज केला होता आणि दुपारी 2.47 वाजता मी त्याच्यावर त्यांना रिप्लाय दिला. तुम्हाला पक्षांतर करायचंय का, असा प्रश्नही मी देवरा यांना केला होता. त्यावर त्यांनी 2.48 वाजता मला एक मेसेज केला की मला तुमच्याशी बोलायचं आहे, हे शक्य होईल का? त्यावर मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला फोन करेन. त्यानुसार मी 3.40 वाजता त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. 

काँग्रेसचे महासचिव यांनी म्हटलं की, फोनवर देवरा यांनी म्हटलं की दक्षिण लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेचा उमेदवार आहे. पण मला राहुल गांधी यांना भेटायचे आहे आणि मतदारसंघाबाबत चर्चा करायची आहे. तसंच, याबाबतीत मीदेखील त्यांच्याशी चर्चा करावी, अशी देवरा यांची इच्छा होती. 

जयराम रमेश यांनी आरोप केला आहे की, मिलिंद देवरा यांना पक्ष सोडायचा होता. राजीनामा देण्याची घोषणा करण्याची वेळही पंतप्रधानांनी ठरवली होती. 

दरम्यान, जयराम रमेश यांनी ट्विटरवरही मिलिंद देवरा यांचे नाव न घेता टिका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, मला आता मुरली देवरा यांच्यासोबत व्यतित केलेले काही क्षण आठवत आहेत. सर्व राजकीय पक्षांसोबत त्यांची मैत्री होती. मात्र ते कट्टर काँग्रेसी होते. ते प्रत्येक कठिण काळात नेहमी काँग्रेस पक्षासोबत उभे राहिले होते. तथास्तू!.