गाड्यांची तोडफोड, रस्त्यावर दूध ओतलं; दूधदर आंदोलक आक्रमक

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातही दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केली.

Updated: Jul 17, 2018, 11:45 AM IST
गाड्यांची तोडफोड, रस्त्यावर दूध ओतलं; दूधदर आंदोलक आक्रमक title=

मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या दूध दर आंदोलनाचे पडसाद आता राज्यभरात उमटण्यास सुरूवात झाली आहे. दूध दर आंदोलनाची व्याप्ती वाढत असून, आंदोलकही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुंबईसह, पुण्यासारख्या शहरांमध्येही दुधाची तुटवडा जाणवू लागला आहे. दरम्यान, आक्रमक झालेल्या आंदोलकांनी दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केली. तर, काही ठिकाणी रस्त्यावर दूध ओतून आपला संताप व्यक्त केला.

कोल्हापूरमध्ये पोलीस बंदोबस्तातील वाहने फोडली

कोल्हापूरातून पोलीस बंदोबस्तात जात असलेल्या वारणा दुध संघाच्या ६ गाड्या शिरोळ तालुक्यातील उदगांव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध दर आंदोलनाची झळ राजधानी मुंबई आणि प्रमुख शहरांना बसू नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दूधाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी दूधाच्या टँकर्सना पोलीस संरक्षणही सरकार पुरवत आहे. पण, त्याचा आंदोलनावर काहीही फरक पडत नसल्याचे पुढे आले आहे. दूधाची वाहतूक खंडीत करण्यासाठी आणि आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी आंदोलकांनी 'गनिमी कावा' निती आवलंबली आहे. याच नितीचा वापर करत आंदोलकांनी पोलीस संरक्षणात दूध वाहतूक करणारे टँकर फोडले.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातही दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केली.

बीडमध्ये दूध रस्त्यावर ओतले

दरम्यान, बीड जिल्ह्यात पाली येथे स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर अडवून दूध रस्त्यावर सोडलं. तर कडा येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शेकडो लिटर दुध रस्त्यावर टाकून भावाढीची मागणी केली. दुधाला योग्य भाववाढ मिळाळवी यासाठी स्वाभिमानाच्या वतीने सोमवारपासून दूध बंद आंदोलन केले जात आहे.