मुदत संपली! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कायमचे घरी पाठवणार?

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांना काल कामावर रुजू होण्यास शेवटची संधी देण्यात आली होती. मात्र, आजपासून जे अद्याप कामावर रुजू झाले नाहीत, त्यांच्यावर आता कारवाई.

Updated: Dec 24, 2021, 09:40 AM IST
मुदत संपली! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कायमचे घरी पाठवणार? title=
संग्रहित छाया

मुंबई : MSRTC Strike Latest News : एसटी कर्मचाऱ्यांना काल कामावर रुजू होण्यास शेवटची संधी देण्यात आली होती. मात्र, आजपासून जे अद्याप कामावर रुजू झाले नाहीत, त्यांच्यावर आता कारवाई अटळ असल्याचे संकेत मिळत आहे. संपकरी एसटी (ST Strike) कामगारांची आजपासून बडतर्फी केली जाणार आहे. त्यामुळे कायमचे घरीच बसावे लागणार आहे.

संपकरी एसटी कर्मचारी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मुद्यावर अद्याप ठाम आहेत. राज्यात अद्याप 102 एसटी आगारे बंदच आहे. दोन दिवसांत 2000 कर्मचारी कामावर परतले आहे. एसटी कर्मचारी कामाकर हजर झाल्यास त्यांच्यावरची सर्व प्रकारची कारवाई मागे घेण्याचं आवाहन केल्यानंतर गेल्या दोन दिवसांत दोन हजार कामगार कामावर परतले. 

कामगारांना एक संधी द्यावी म्हणून काल शेवटची संधी देण्यात आली होती. परिवहनमंत्री अनिल परब यांनी बडतर्फीच्या कारवाईला बगल देत कामावर परतल्यास सर्व कारवाई मागे घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र म्हणावा तसा कामगारांचा प्रतिसाद न मिळाल्याने आता निलंबित कर्मचा-यांवरील बडतर्फीची कारवाई आजपासून सुरू होणार आहे.

एसटी महामंडळाच्या राज्यातील 250 आगारांपैकी 148 आगारांची वाहतूक अंशतः चालू करण्यात यश आले. अद्याप 102 आगारे बंद आहेत.