मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट; 50 मिनिटांचे अंतर अवघ्या 20 मिनिटांत, नवा मार्ग तयार होतोय

Mumbai News Update: मुंबई आता आणखी दोन शहरांना जोडणार आहे. नव्या मार्गामुळं आता 50 मिनिटांचे अंतर 20 मिनिटांत कापणे शक्य होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 12, 2023, 11:24 AM IST
मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट; 50 मिनिटांचे अंतर अवघ्या 20 मिनिटांत, नवा मार्ग तयार होतोय title=
मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट; 50 मिनिटांचे अंतर अवघ्या 20 मिनिटांत, नवा मार्ग तयार होतोय|mumbai dahisar mira bhayandar elevated link road will be ready in 2026

Mumbai News:  मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोप्पा होणार आहे. आता दहिसरहून मीरा-भाईंदरदरम्यान तयार होत असलेल्या उन्नत जोडरस्ताबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या प्रकल्पासाठी तीन बड्या कंपन्यांनी रुची दाखवली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून तीनवेळा या प्रकल्पासाठी टेंडर जारी करण्यात आले होते. मात्र, तेव्हा कोणत्याही कंपनीने रस दाखवला नव्हता. मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त उल्हास महाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंडर भरण्यासाठी मंगळवारपर्यंतच मुदत होती. त्यावेळीस तीन कंपन्यांकडून टेंडर भरण्यात आले आहे. या प्रकल्पामुळं 45 मिनिटांचे अंतर अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. 

मुंबई महापालिकेकडून दहिसर-भाईंदर उन्नत जोडरस्ता बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी एल अँड टी, जे. कुमार आणि एफकॉन या बड्या कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. यातील सर्वात कमी रक्कमेची बोली सादर करणाऱ्या कंपनीला हे काम देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे तीन हजार कोटी इतका आहे. 2026पर्यंत दहिसर-मीरा भाईंदर उन्नत जोडरस्त्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि एमएमआर परिसरातील रस्ते बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी मुंबई महापालिका अनेक प्रोजेक्टवर काम करत आहेत. 

दहिसर ते मीरा भाईंदरदरम्यान तयार होणारा जोडरस्ता पूर्ण झाल्यास मुंबईहून मीरा-भाईंदर, वसई-विरार, पालघर, गुजरात, राजस्थान आणि दिल्लीकडे जाणाऱ्या लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. विनाअडथळा जलद प्रवास व्हावा यासाठी या मार्ग उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दहिसर पश्चिमेला कांदरपाडा मेट्रो स्थानक ते भाईंदर पश्चिमेला उत्तनपर्यंत हा मार्ग असेल. 

दहिसर-भाईंदर उन्नत मार्ग पाच किमी लांब आणि 45 मीटर रुंद असेल. या मार्गावर प्रत्येकी चार लेन असणार आहेत. या लिंकरोड तयार झाल्यानंतर दहिसर- मीरा भाईंदर दरम्यान अंतर कमी होणार आहे. त्याचबरोबर अंतर कमी झाल्यामुळं पेट्रोलचीही बचत होणार आहे. 

असा असेल प्रकल्प

उन्नत मार्ग 5 किमी लांब आणि 45 मीटर रुंद असेल. नरीमन पॉइंट ते दहिसरपर्यंत सागरी किनारा मार्ग होणार असून तो या उन्नत मार्गाला जोडला जाईल. नरीमन पॉइंटहून सुरू झाल्यानंतर वरळी सी लिंक पर्यंत कोस्टल रोड तिथून सीलिंकहून वांद्रे आणि नंतर वांद्रे वे वर्सोवा आणि वर्सोवाहून कांदिवलीमधून दहिसरपर्यंत हा मार्ग तयार होणार आहे. तिथून तो उन्नत मार्गाला जोडणार आहे. 

काय फायदा होणार 

दहिसर ते भाईंदर हा सध्याचा 45 ते 50 मिनिटांचा प्रवास आहे. मात्र या मार्गामुळं 15 ते 20 मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळं दहिसर चेक नाक्यावरील वाहनांची गर्दी कमी होऊन 35 टक्के वाहनांचा भार कमी होईल.