मुंबई - गोवा महामार्गावरची बंद पडलेली वाहतूक सुरु, खेड शहरात पुराचे पाणी

मुंबई - गोवा महामार्ग काही काळ ठप्प झालेला. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महामार्ग ठप्प झाला होता.  

Updated: Jul 12, 2019, 10:41 AM IST
मुंबई - गोवा महामार्गावरची बंद पडलेली वाहतूक सुरु, खेड शहरात पुराचे पाणी title=
संग्रहित छाया

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग काही काळ ठप्प झालेला. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महामार्ग ठप्प झाला होता. पहाटे पावणे सातपासून जवळपास दोन तास महामार्ग बंद होता. नऊच्या सुमाराला हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी खेडमधल्या मदत ग्रुपच्या सदस्यांनी पोलिसांना सहकार्य केले. नदीच्या पाण्याची पातळी सात मीटरपर्यंत वाढली होती. पर्यायी मार्ग नसल्याने मुंबई - गोवा महामार्गावरीची वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान, खेडमधील दुसऱ्या एका नारंगी नदीला पूर आला आहे. खेड - दापोली मार्गावर नारंगी नदीचे पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. खेड - दापोलीचा त्यामुळे संपर्क तुटला आहे. दळवळणासाठी हा एकच मार्ग असल्याने रस्त्यावर वाहानांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. दरम्यान, खेड शहरात सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपला माल आणि साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी आणि नारंगी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून  मुंबई - गोवा महामार्गावरचा जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.  

रत्नागिरत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. या दोन्ही नद्यांवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.