लेक बनली आईची शिक्षिका, बारावीच्या परीक्षेत एकाचवेळी दोघी झाल्या उत्तीर्ण

HSC Result 2024: बारावीच्या निकालात आई-मुलीने मोठे यश मिळवले आहे. दोघीनी बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.   

मानसी क्षीरसागर | Updated: May 22, 2024, 06:42 PM IST
 लेक बनली आईची शिक्षिका, बारावीच्या परीक्षेत एकाचवेळी दोघी झाल्या उत्तीर्ण title=
mumbai News Mother Daughter Duo Clear hsc board exam 2024 Together

सीमा आढे, झी मीडिया

HSC Result 2024: नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात बारावीचा निकाल 93.37 टक्के निकाल लागला आहे. तर, यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मानखुर्द येथील एका माय-लेकीनेदेखील यशाला गवसणी घातली आहे. मुलीसह आईने बारावीच्या परीक्षेत भरघोस यश प्राप्त केले. मुलीच्याच मार्गदर्शनाखाली आईने हे यश प्राप्त केल्याचे ती अभिमानाने सांगते. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया. 

४० वर्षीय रेश्मा मुल्ला आणि त्यांच्या कन्या सानिया यांनी बारावीच्या परीक्षेत भरघोस यश प्राप्त केले आहे. आपली छोटी नोकरी, घर सांभाळत रेश्मा ताईने  आपल्या मुलीच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत हे यश संपादित केलं आहे. रेश्मा मुल्ला यांनी कला शाखेतून ५५ टक्के मार्क मिळवले आहेत. त्यांच्या या यशाचे त्यांच्या कुटुंबीयांनी व परिसरातील लोकांकडून कौतुक होत आहे. 

रेश्मा मुल्ला या मानखुर्द येथे मागील १० वर्षांपासून अंगणवाडीत मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. २००७ मध्ये मदतनीस म्हणून त्या रुजू झाल्या. मात्र राज्य सरकारच्या जीआरनुसार अंगणवाडी मदतनीसवरून सेविका म्हणून कायमस्वरूपी होण्यासाठी त्यांना किमान १२ वी पास ही पात्रता आवश्यक आहे. हे पाहता रेश्मा यांनी यंदाच्या वर्षी त्यांची मुलगी सानिया हिच्यासोबत १२ वीची परीक्षा देण्याचे ठरवले. 

सनियावर दोन जबाबदाऱ्या होत्या. एक तर स्वतःच अभ्यासाची आणि आईचा अभ्यास करून घ्यायची. या प्रवासात त्यांच्यासमोर अनेक समस्या आल्या. या बद्दल बोलताना मुलगी सानिया हिला अश्रू अनावर झाले. जिद्दीने अभ्यास करून रेश्मा मुल्ला या बारावीची परीक्षा पास झाल्या. आता त्या पदवीचे शिक्षण देखील घेणार आहेत. रेश्मा मुल्ला यांची मुलगी सानिया ही देखील बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेतून ६० टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाली आहे. या दोघींच्या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांतही आनंदाचे वातावरण होते.

राज्यात बारावीचा निकाल काय लागला?

यंदा राज्यात बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. तर, कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. 91.51 टक्के निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर, 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग मात्र सर्वात कमी लागला आहे. तर, यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून 91.60 टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.