जिने मरणाच्या दारातून वाचवले तिलाच संपवले; रात्रभर मृतदेहासोबत झोपून राहिला, सकाळीच...

Husband Killed Wife In Nagpur: पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत वाद घालून पतीने तिच्या डोक्यावर हतोडी मारून पत्नीचा खून केला आहे. नागपूरात हा थरार घडला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 19, 2023, 10:21 AM IST
 जिने मरणाच्या दारातून वाचवले तिलाच संपवले; रात्रभर मृतदेहासोबत झोपून राहिला, सकाळीच... title=
nagpur man killed his wife suspect immoral relationship

पराग ढोबळे, झी मीडिया

Nagpur Crime News: महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. संत्रानगरीही ओळख असलेले नागपूर क्राइम (Nagpur Crime) कॅपिटल बनत चालले आहे, अशी टीका वारंवार होत असते. नागपूरात आज पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच पत्नीच्या डोक्यात हातोडा घालत खून केल्याची घटना घडली आहे. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Husband Killed Wife)

पतीने बायकोच्या चरित्र्यावर संशय घेत वाद घालून पतीने डोक्यावर हातोडी मारून पत्नीची हत्या केली आहे. खून प्रकरणात पतीला नंदनवन पोलिसांनी अटक केली. अर्चना अस मृतक पत्नीचं तर रमेश भारस्कर असं निर्दयी पतीचं नाव आहे. रमेश आणि अर्चना यांना दोन मुली आहेत. घराशेजारी राहणाऱ्या युवकाशी पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. त्याच संशयातून तो नेहमी तिला मारहाण करत होता. 

दुसऱ्या पत्नीलाही मारहाण

रमेशचे हे दुसरे लग्न होते. चारित्र्यावर संशय घेतल्याकारणेने त्याची पहिली पत्नी सोडून गेली होती. त्यानंतर त्याने अर्चनासोबत लग्न केले होते. दोघांच्या लग्नाला 13 वर्षे झाली होती. पण लग्नाच्या काही दिवसांतच रमेश अर्चनाला त्रास देऊ लागला. रमेश वारंवार अर्चनाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तसंच, तिला मारहाण करत वाद घालत होता. 

रमेशच्या रोजच्या त्रासाला वैतागून अर्चना घरसोडून गेली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रमेश आजारी असल्याने त्याच्या नातेवाईकांनी तिची मनधरणी करत तिला पुन्हा बोलवले होते. त्यानंतर ती घरी पुन्हा परतली होती. मात्र, त्याच्या तब्येतीत सुधार होताच तो पुन्हा तसाच वागू लागला होता. तिला सतत मारहाण करु लागला. 

मृतदेहासोबतच घरात झोपला

मंगळवारी मध्यरात्री असाच रमेशने बायकोसोबत वाद घातला. वाद झाल्यानंतर त्यांने संतापाच्या भरात अर्चनाच्या डोक्यात हातोडीने वार केला. रमेशचा वार वर्मी लागल्याने अर्चनाच्या डोक्यातून भळभळा रक्त येऊ लागले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. इतकंच नव्हे तर, अर्चनाचा खून केल्यानंतर रमेश रात्रभर मृतदेहासोबतच घरात झोपून राहिला. त्यानंतर सकाळी उठून घराला कुलूप लावून तो निघून गेला.

बहिणीला फोन करुन दिली माहिती

सकाळी उठल्यानंतर त्याने बाहेरगावी राहणाऱ्या त्याच्या आत्याला फोन केला. त्यानंतर धास्तावलेल्या आत्याने संपूर्ण प्रकार रमेशच्या घराशेजारी राहणाऱ्या लहान भाऊ अशोकला सांगितला. अशोकने घरात जाऊन पाहिल्यावर अर्चना रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. अशोकने या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला जाऊन नंदनवन पोलिसांना दिली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत रमेशला अटक केली आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.