नाशिक हादरलं! भाच्याने मामीकडे केली Sex ची मागणी! नकार दिल्याने हत्या

Man Killed 27 year old Aunt: पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये अज्ञात व्यक्तीने या महिलेची हत्या करुन आरोपीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचं मयत महिलेच्या पतीने म्हणजेच आरोपीच्या मामाने म्हटलं होतं. त्याच दिशेने आधी तपास सुरु झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 9, 2024, 11:52 AM IST
नाशिक हादरलं! भाच्याने मामीकडे केली Sex ची मागणी! नकार दिल्याने हत्या title=
घडलेल्या घटनाक्रमाची पोलिसांनी दिली माहिती

Man Killed 27 year old Aunt: नाशिकमध्ये मामा-भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 6 मार्च रोजी नाशिक रोड भागात राहत्या घरात एका महिलेची हत्या झाल्याच्या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आला आहे. मामीकडे शरीरसुखाची मागणी केल्यानंतर तिने नकार दिल्याने भाच्यानेच मामीची निघ्रृण हत्या केल्याचं उघड झालं असून यासंदर्भातील माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळकेंनी यासंदर्भातील सविस्तर माहिती शुक्रवारी प्रसारमाध्यमांना दिली. 

नेमका हा प्रकार घडला कुठे?

"6 मार्च 2024 रोजी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ जगताप मळा परिसरामध्ये ही घटना घडली आहे. मयत महिलेचे नाव कांती सुदाम बनेरीया असं आहे. कांती या केवळ 27 वर्षांच्या होत्या. कांती या त्यांच्या पतीला पाणीपुरी आणि भेळपुरी विकण्याच्या व्यवसायामध्ये हातभार लावायच्या," असं शेळकेंनी सांगितलं. एकलहरे परिसरात राहणारं बनेरीया कुटुंब हे हातावर पोट असलेलं कुटुंब आहे, असंही शेळकेंनी नमूद केलं.

दोघांबरोबर राहत होता भाचा

"कांती आणि त्यांच्या पतीबरोबर मागील 7 ते 8 महिन्यांपासून पती सुदामचा भाचा अभिषेक सिंह राहत होता. अभिषेक हा मूळ गावी येऊन जाऊन नाशिकमधील आपल्या मामाच्या घरी राहत होता. काही दिवसांपूर्वी तो इथे राहायला आला होता. तो सुद्धा पाणीपुरीच्या व्यवसायामध्ये होता," अशी माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली.

भाच्याच्या गळ्यावर होते वार

कांती यांची हत्या झाली त्यावेळी घरात असलेल्या अभिषेकवरही अज्ञात व्यक्तीने वार केल्याचा दावा करण्यात आला. अभिषेकच्या गळ्यावरही वार करण्यात आले होते, असं पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं. "भाचा अभिषेकने दिलेल्या माहितीच्या आधारे मयत कांतीचे पती सुदाम यांनी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, अज्ञात इसमाने पत्नीची हत्या करुन भाच्याच्या गळ्यावर चाकूने हल्ला केल्याचं सुदाम यांनी म्हटलं होतं. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावा आणि केलेल्या तक्रारीमधील घटनाक्रम जुळवून खात्री करुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही अज्ञात इसम या ठिकाणी आलेला नव्हता असं पोलिसांच्या तपासात समोर आलं," असं शेळकेंनी सांगितलं. 

नक्की वाचा >> 'मी शुद्धीवर आले तेव्हा तो माझ्यावर बलात्कार करत होता'; 21 वर्षीय मुंबईकर तरुणीच्या दाव्याने खळबळ

मामीकडून शरीरसुखाची मागणी

"पोलिसांनी तपास अन्य मार्गाने सुरु केला. पोलिसांनी कांती, सुदाम आणि अभिषेक या तिघांचेही मोबाईल रेकॉर्ड्स तपासले. परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर माहिती पोलिसांनी गोळा केली. या तपासात असं निष्पण्ण झालं की कांतीचा भाचा अभिषेक हा तिच्याकडे अनैतिक संबंधांसाठी (शरीरसुखाची) सातत्याने मागणी करायचा. मात्र कांती त्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष करायची. यातूनच कांती आणि अभिषेकमध्ये वाद झाला होता. याच मुळ वादातून रोज वेगवेगळ्या गोष्टींचं निमित्त काढून या दोघांमध्ये वाद व्हायचे. त्यामुळेच अभिषेकला घरातून कायमचं हकलवून लावण्याचा कांतीचा विचार होता. यासंदर्भातील चाहूल अभिषेकला लागली. त्यामुळेच त्याने स्वत:च्या मामीची हत्या केली," असं पोलिसांनी सांगितलं आहे.

...म्हणून स्वत:वर केले वार

आपणच मामीची हत्या केली आहे हे उघडकीस येऊ नये म्हणून अभिषेकने स्वत:च्या गळ्यावर वार करुन घेतले आहेत. तो स्वत: गुन्हा लपवण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत, असं शेळके म्हणाले. पोलिसांची त्याच्यावर नजर असून तो बरा झाल्यानंतर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाईला सुरुवात होईल असं पोलिसांनी सांगितलं.

तपासाची दिशा वळवण्याचा प्रयत्न...

अज्ञात इसम सांगून तपासाची दिशा वळवण्याचा प्रयत्न आरोपीने केला. मात्र वरिष्ठांच्या सूचनेनुसार योग्य मार्गावर तपास करत पोलीस खऱ्या आरोपीपर्यंत पोहचल्याबद्दल शेळकेंनी पोलिसांच्या टीमचं कौतुक केलं आहे.