नवरात्रोत्सवात डीजे, लेझर लाईटवर बंदी; पोलिसांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

Navratri Utsav 2023 : नाशिकमध्ये लेझरच्या वापरामुळे अनेकांच्या डोळ्याला इजा झाली आहे. तसेच डीजेच्या दणदणाटामुळेही अनेकांनी आरोग्यासंदर्भातील तक्रारी केल्या आहेत. अशातच आता नाशिक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 5, 2023, 12:12 PM IST
नवरात्रोत्सवात डीजे, लेझर लाईटवर बंदी; पोलिसांनी घेतला महत्त्वाचा निर्णय title=
(फोटो सौजन्य - PTI)

Navratri Utsav 2023 : राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव पार पडला आहे. मात्र गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डीजे, डॉल्बी आणि लेझर बीमचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. दरम्यान विसर्जन मिरवणुकीत लेझरमुळे नाशिकमध्ये (Nashik News) अनेक तरुणांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. तर अनेकजण आपली दृष्टी गमावण्याची शक्यता आहे. अशातच आता नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवात झालेल्या प्रकारामुळे नाशिकमध्ये डीजे आणि लेझरवर पोलीस आयुक्तालयाने निर्बंध घातले आहेत. तसेच नवरात्रोत्सवात (Navratri) लेझर आणि डीजेचा वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तसेच डीजे वाजवणाऱ्यां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच लेझरमुळे अनेक तरुणांच्या डोळ्यांना इजा झाल्याने नाशिक पोलिसांनी नवरात्रोत्सवात यावर बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळांनी डीजेचा दणदणाट व लेझरचा झगमगाट करत पोलिसांचे आदेशाला पायदळी तुडवले होते. विसर्जन मिरवणुकांमध्ये आवाजाच्या मर्यादेचेही पालनही झाले नाही. अनेकांनी त्रास झाल्याच्या तक्रारी देखील केल्या होत्या. त्यामुळे आता शहर पोलिसांनी डीजेचा दणदणाट करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डीजेचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. 

यासह आता गरब्याचे आयोजन करणाऱ्या नवरात्रोत्सव मंडळांना लेझर उपकरणांचा वापर करता येणार नाही. नवरात्रोत्सवात गरबा व दांडिया आयोजित करणाऱ्या मंडळांना डीजे लावण्यास पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच साउंड सिस्टिमचा मर्यादित आवाजात वापर करण्याचे आदेश पोलिसांनी काढले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच यासंदर्भातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह आयोजकांना पोलिसांकडून सूचना करण्यात येत आहे. 10 दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सव आणि नियमांसंदर्भात पोलिस आयुक्तालयात बैठक होण्याची शक्यता आहे.