लेझर लाईटमुळे गणपती विसर्जन मिरवणुकीतील 6 जणांची नजर कमकुवत! डोळा कायमचा गमावण्याची भीती

Nashik News : नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटमुळे सहा जणांच्या डोळ्याला गंभीर इजा पोहोचली आहे. अनेकांना तर पुन्हा दिसेल की नाही याची शाश्वती नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अनेकांनी त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशाही सूचना नेत्ररोग तज्ज्ञांनी दिल्या आहेत.

आकाश नेटके | Updated: Oct 2, 2023, 10:06 AM IST
लेझर लाईटमुळे गणपती विसर्जन मिरवणुकीतील 6 जणांची नजर कमकुवत! डोळा कायमचा गमावण्याची भीती title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  गणपती विसर्जन मिरवणुकीतील (Ganeshotsav 2023) डिजे डॉल्बी (DJ Dollby) सिस्टीमसोबत असलेल्या लेझर लाईटमुळे (Laser Light) नाशिक जिल्ह्यात (Nashik News) सहा रुग्णांच्या दृष्टीवर भयानक परिणाम झाल्याचं समोर आल आहे. तब्बल आठ वर्षानंतर नाशिक शहरांमध्ये डीजेला विसर्जन मिरवणुकीमध्ये परवानगी देण्यात आली होती. डीजेच्या तालावर नाचताना बेभान होणाऱ्या तरुणांवर डिजेवर लावलेल्या लेझर लाईटची प्रखर प्रकाश झोत पडल्याने काहींच्या डोळ्यांमध्ये इजा तर काहींच्या डोळ्यांमध्ये काळे डाग निर्माण झाले आहेत. तरुणांच्या डोळ्यावर भाजल्यासारख्या जखमा नेत्ररोग तज्ञांना आढळून आल्या आहेत. 

या रुग्णांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. अशा प्रकारचा त्रास होत असलेल्या पीडितांनी तातडीने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावं असा आवाहन करण्यात आले आहे. नेत्ररोग तज्ञ संघटनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत जनजागृती देखिल सुरू केली असून सरकारने या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंतीही केली आहे. मनसे राज ठाकरेंच्या ट्विटनंतर हा विषय चर्चेत आला असतानाच नाशिकमध्ये असे प्रकरणेच समोर येऊ लागली आहेत.

दृष्टी जितकी बचावता येईल यासाठी प्रयत्न

"रुग्णांनी सांगितले की गणपती मिरवणुकीमध्ये लेझर लाईटसच्या संपर्कात ते आले होते. सर्व रुग्णांनी हेच सांगितले. सर्व रुग्ण हे नाशिक शहरातील होते. याबद्दल आमच्या ग्रुपवर चर्चा झाल्यानंतर नंदुरबार, धुळे आणि मुंबई इथल्या मित्रांनीही याबाबत सांगितले. आम्ही सगळेच जण या रुग्णांची दृष्टी जितकी बचावता येईल यासाठी प्रयत्न करत आहोत. पण ते पूर्णपणे व्यवस्थित होऊ शकणार नाही," असे नेत्ररोग तज्ञ सुनील कासलीवाल यांनी सांगितले. 

"रुग्णांची दृष्टी कमी होण्याचे कारण लेझरचा वापर आहे. हे लेझर पाच मिलिव्हॅट पेक्षा जास्त क्षमतेचे असतात तेव्हा त्याचा परिणाम दृष्टी पटलावर होतो. मिरवणुकींमध्ये त्यापेक्षा जास्त पावरचे लेझर वापरण्यात येत आहे. हे लेझर वापरण्यात येऊ नये यासंदर्भात आम्ही आवाहन करत आहोत. सरकारच्या मान्यता प्राप्त लेझरचा वापर करावा. मिरवणुकांमध्ये 14 ते 40 वयोगाटातील लोकांचे सहभागी होण्याचे प्रमाण जास्त आहे," असे नाशिक नेत्ररोग तज्ञ संघटनेचे अजित खुने यांनी सांगतिले.

डीजे आणि लाईट्सच्या अतिरेकावर राज ठाकरेंचं पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व राजकीय नेते, सरकार, सामाजिक विचारवंत आणि गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन गणेशोत्सवाला चुकीचे स्वरुप येण्यापासून रोखले पाहिजे, असे म्हटलं आहे. यासाठी त्यांनी राज्य सरकार, सर्व गणेशोत्सव मंडळे आणि समाजातील जाणकारांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी प्रामुख्याने डीजेच्या आवाजामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेतली आहे.