राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा, लोकसभेसाठी तटकरेंच्या नावाची अधिकृत घोषणा?

देशात आणि राज्यात सत्ताबदल करण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.  

Updated: Jan 9, 2019, 08:50 PM IST
राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा, लोकसभेसाठी तटकरेंच्या नावाची अधिकृत घोषणा? title=

अलिबाग : देशात आणि राज्यात सत्ताबदल करण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.  भाजपविरोधी वातावरण तयार केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तनाचा ही यात्रा गुरुवारी रायगडमधून सुरू होत आहे. किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराज आणि चवदार तळ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या यात्रेला प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने महाडच्या भिलारे मैदानावर जाहीर सभा आयोजित केली आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार शक्तीप्रदर्शन 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्यासह राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. या सभेला 20 हजार कार्यकर्ते हजेरी लावतील असा अंदाज आहे. यानिमित्ताने कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. कोकणात राष्ट्रवादीची ताकद फारशी नाही. त्यातच आगामी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता कोकणातील रायगड लोकसभेची जागा आघाडीच्यावतीने आपल्याला मिळावी, असा आग्रह राष्ट्रवादीने धरला आहे. या पार्शवभूमीवर त्यांचे हे महाडमधील शक्तीप्रदर्शन महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान गुरुवारच्या मेळाव्यात रायगड लोकसभेच्या जागेसाठी सुनील तटकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिवर्तन यात्रेकडे लक्ष लागले आहे.

निवडणूक प्रचाराचा नाराळ फुटणार !

या 'निर्धार परिवर्तनाचा' यात्रेत राष्ट्रवादी आपल्या निवडणूक प्रचाराचा नाराळ फोडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी त्यानिमित्ताने दिल्लीत हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेत महाराष्ट्रातील जागांचा तिढा सोडविण्यावर भर दिलाय. आता रायगडची जागा राष्ट्रवादी आपल्या पदरात पाडून घेणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत सुनील तटकरे हे रायगडमधून लोकसभेचे उमेदवार असतील असे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांना कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याची एक छलक पाहायला मिळाली. शिवसेनेचे नाराज माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी भेट घेत, शिवसेनेला सूचीत इशारा दिला आहे. तसेच आधीच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदावर अनंत गिते हे कमी मताधिक्यांनी विजयी झालेत. त्यावेळी सुनील तटकरे यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे आता सुनील तटकरे हे राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवतील याबाबत घोषणा या निर्धार पिरवर्तन यात्रेत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तटकरे हे आपले शक्तीप्रदर्शन दाखविण्याची अधिक शक्यत आहे.