Parbhani Loksabha : महादेव जानकर रोखणार बंडू जाधवांच्या विजयाची हॅटट्रीक? पाहा कसंय परभणीचं राजकीय गणित

Mahadev Janakar vs Sanjay Jadhav : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेलं परभणी... शिवसेना ठाकरे गटाचा हा बालेकिल्ला (Parbhani Loksabha) काबीज करण्यासाठी महायुतीनं यावेळी वेगळाच डाव टाकलाय.. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट 

सौरभ तळेकर | Updated: Mar 31, 2024, 08:56 PM IST
Parbhani Loksabha : महादेव जानकर रोखणार बंडू जाधवांच्या विजयाची हॅटट्रीक? पाहा कसंय परभणीचं राजकीय गणित title=
Parbhani Loksabha Election 2024 Political Scenario

Lok Sabha Election 2024 : परभणी... संत जनाबाईंची जन्मभूमी... सबका मालिक एक अशी शिकवण देणा-या शिर्डीच्या साईबाबांचं पाथरी हे जन्मस्थानही परभणीतलंच... हिंदू मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेला हजरत सय्यद शाहांचा ऊरूस इथं शेकडो वर्षांपासून भरतो. त्या दर्ग्यात रेंगे नावाचे हिंदू कुटुंबीय अनेक पिढ्यांपासून पुजारी आहेत. जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण वर्ल्ड फेमस आहे. बनी तो बनी, नही तो परभणी असा वाक्प्रचारही आहे. आता यांचा नेमका अर्थ काय, ते परभणीकरच जाणोत. तर अशा या परभणीत विकासाची अवस्था मात्र केविलवाणी आहे. (Parbhani Loksabha Election 2024 Political Scenario)

परभणी... अवस्था केविलवाणी 

जगात जर्मनी अन् भारतात परभणी असं म्हटलं जातं, पण परभणीत रस्ते, पाणी, दळणवळण सारख्या मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. झिरो फाटा ते परभणी राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलंय. एमआयडीसी आहे, मात्र मोठे उद्योग व्यवसाय नाहीत. शेती हाच एकमेव व्यवसाय आहे. मात्र सततचा दुष्काळ, गारपिटीमुळं आत्महत्येची वेळ बळीराजावर येते. बेरोजगारी, कामानिमित्त होणारं स्थलांतर हे देखील मुख्य प्रश्न आहेत.

परभणीचं राजकीय गणित (Parbhani Political Scenario)

एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाची पकड असलेला हा मतदारसंघ... मात्र तो शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला बनलाय. १९९९ पासून आतापर्यंत लागोपाठ पाचवेळा शिवसेनेचा खासदार इथून विजयी झालाय. २००९ मध्ये शिवसेनेचे गणेशराव दुधगावकर यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश वरपुडकरांचा ६५ हजार मतांनी पराभव केला. २०१४ मध्ये शिवसेनेनं संजय जाधवांना मैदानात उतरवलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या विजय भांबळेंना सव्वा लाख मतांनी हरवलं. तर 2019 मध्ये पुन्हा एकदा जाधवांनी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांना 42 हजार मतांनी धूळ चारली. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 2 आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रत्येकी 1 आमदार आहे.

शिवसेना ठाकरे गटानं यंदा पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांना विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी उमेदवारी दिलीय. तर ठाकरेंचा हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी महायुतीनं नवा राजकीय डाव टाकलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटानं आपल्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना रणमैदानात उतरवलंय. परभणी लोकसभा मतदारसंघात जालन्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. मराठा आणि मुस्लीम मतदारांची संख्या इथं लक्षणीय असल्यानं जातीय समीकरण फार महत्त्वाचं ठरतं. सोयरे धाय-यांसह हिंदू-मुस्लीम राजकारण चालतं. खान पाहिजे की बाण, या पातळीवर इथं प्रचार होतो. 

दरम्यान, खासदार संजय जाधवांची विजयाची हॅटट्रिक रोखण्यासाठी महायुतीनं महादेव जाणकरांना रणमैदानात उतरवलंय. मात्र त्यांच्या उमेदवारीमुळं महायुतीतल्या इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटू शकतो. त्यात गेल्यावेळी तब्बल दीड लाख मतं खेचणारी वंचित बहुजन आघाडी कोण उमेदवार देणार, यावर परभरणीतलं राजकीय गणित अवलंबून असणार आहे.